न्यूझीलंडने शिकविले युगांडाला क्रिकेटचे धडे; 40 धावांत खुर्दा; 32 चेंडूंत विजय

टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आलेल्या न्यूझीलंडने गटफेरीच्या तिसऱ्या लढतीत नवख्या युगांडाला क्रिकेटचे चांगलेच धडे शिकविले. आधी युगांडाचा केवळ 40 धावांत खुर्दा अन् नंतर अवघ्या 32 चेंडूंत विजय साकारला. 4 धावांत 3 विकेट  टिपणारा टीम साऊदी या विजयाचा शिल्पकार ठरला.

न्यूझीलंडने युगांडाकडून मिळालेले 41 धावांचे लक्ष्य 5.2 षटकांत एका फलंदाजाच्या मोबदल्यात पूर्ण केले. फिन एलेन 9 धावांवर बाद झाला. त्याला रियाझत अली खानने फ्रेड अचेलमकरवी झेलबाद केले. ड्वोन कॉन्वेने 15 चेंडूंत 4 चौकारांसह नाबाद 22 धावा केल्या. त्याने रचिन रवींद्रच्या (1) साथीत न्यूझीलंडच्या विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

न्यूझीलंड-युगांडा यांच्यातील लढत मांजर-उंदराच्या लढाईसारखी वाटली. त्यात नाणेफेकीचा कौलही न्यूझीलंडच्याच बाजूने लागला. सर्वच किवी गोलंदाजांनी टिच्चून मारा करीत युगांडाला 18.4 षटकांत 40 धावांत गुंडाळले. केनेथ वैस्वा (11) हा युगांडाचा एकमेव फलंदाज दुहेरी धावा करू शकला. चार फलंदाजांना तर भोपळाही फोडता आला नाही, तर इतर फलंदाजही केवळ हजेरीवीर ठरले. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने 4 षटकांत 4 धावांच्या मोबदल्यात  3 फलंदाज बाद केले. ट्रेंट बोल्ट, मिचेल सॅण्टनर व रचिन रवींद्र यांनी प्रत्येकी 2, तर लॉकी फर्ग्युसनने एक विकेट घेतली. साऊदी, बोल्ट आणि रचिन यांनी प्रत्येक एक षटक निर्धाव टाकले.