के.एल. राहुलची ‘हनुमान’ उडी, टी-20 कारकीर्दीतील सर्वोच्च स्थानावर पोहोचला

7322

न्यूझीलंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेमध्ये टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज के.एल. राहुलने आपल्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांचे मन जिंकले. कोणत्याही स्थानावर फलंदाजीसाठी तयार असणाऱ्या, प्रसंगी यष्टीरक्षण आणि कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या राहुलने न्यूझीलंडविरुद्धची मालिका गाजवली. राहुलने या मालिकेत सर्वाधिक 224 धावा करत ‘मालिकावीरचा किताब पटकावला. मालिका संपताच आयसीसीने टी-20 क्रिकेटची क्रमवारी घोषित केली असून राहुलने यात ‘हनुमान’ उडी घेतली आहे. राहुल टी-20 क्रिकेट कारकीर्दीतील सर्वोच्च अशा दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या मालिकेमध्ये टीम इंडियाने यजमान संघाला व्हाईटवॉश दिला. पाच सामन्यांच्या मालिकेतील सर्व सामने जिंकत टीम इंडियाने टी-20 क्रिकेटमधील आपले वर्चस्व सिद्ध केले. ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाच्या या विजयाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या मालिकेमध्ये राहुलने फलंदाजीमध्ये दमदार कामगिरी केली. राहुलने 56, नाबाद 57, 27 37 (सुपर ओव्हरमध्ये 10) आणि 45 धावांची खेळी केली. यासह पंतच्या अनुपस्थितीमध्ये यष्ट्यांमागे चांगले झेल घेतले. याचा त्याला आयसीसी क्रमवारीमध्ये फायदा झाला आहे.

हिंदुस्थानचे ऐतिहासिक यश! न्यूझीलंडला घरच्या मैदानात 5-0 ने लोळवले

आयसीसीच्या ताज्या क्रमावीरमध्ये टॉप 10 मध्ये के.एल. राहुलसह कर्णधार विराट कोहली नवव्या आणि रोहित शर्मा तीन स्थानांच्या सुधारणेसह 10 व्या स्थानावर पोहोचला आहे. यासह श्रेयस अय्यर यानेही या मालिकेमध्ये काही चांगल्या खेळी केल्याने तो 63 व्या स्थानावरून 55 व्या स्थानावर पोहोचला आहे, तर मनिष पांडे 12 स्थानांच्या सुधारणेसह 58 व्या स्थानावर विराजमान झाला आहे.

गोलंदाजांच्या क्रमवारीमध्ये वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने 26 स्थानांची उडी घेत 11 वे स्थान पटकावले आहे. युझवेंद्र चहल 30 व्या स्थानावर, मालिकेत 8 विकेट्स घेणारा शार्दुल ठाकूर 57 व्या, नवदीप सैनी 71 व्या आणि रविंद्र जाडेजा 76 व्या स्थानावर पोहोचला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या