
आशिया चषकातून पाकिस्तानला गाशा गुंडाळावा लागला आहे. गुरुवारी झालेल्या लढतीत श्रीलंकेने 2 विकेट्सने विजय मिळवत पाकिस्तानला घरचा रस्ता दाखवला. फायनलमध्ये आता हिंदुस्थान आणि श्रीलंकेमध्ये लढत होईल. 17 सप्टेंबर रोजी कोलंबोमध्ये हा सामना रंगणार आहे. दरम्यान, सुपर-4 लढतीत श्रीलंकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागल्याने आशिया चषक जिंकण्याचे पाकिस्तानचे स्वप्न भंगले. यासोबतच पाकिस्तानला आणखी एक धक्का बसला आहे.
श्रीलंकेविरुद्ध झालेल्या लढतीत पाकिस्तानला 2 विकेट्सने पराभव स्वीकाराला लागला. या लढतीनंतर आयसीसीच्या एक दिवसीय क्रमवारीतही मोठी उलथापालथ झाली. आशिया चषक सुरू होण्यापूर्वी पहिल्या स्थानावर असणारा पाकिस्तानचा संघ आता तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दमदार कामगिरी करून ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे. दुसरीकडे पाकिस्तानच्या खराब कामगिरीचा फायदा हिंदस्थानला झाला आहे. हिंदुस्थानचा संघ आता नंबर दोनवर पोहोचला आहे.
आशिया चषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी पाकिस्तानला विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होता. पहिल्या लढतीत नेपाळवर विक्रमी विजय मिळवत पाकिस्तानने चांगली सुरुवात केली. दुसऱ्या लढतीत पाकिस्तानच्या गोलंदाजांनी हिंदुस्थानी फलंदाजांच्या नाकीनऊ आणले, मात्र पावसामुळे हा सामना पूर्ण होऊ शकला नाही. त्यानंतर सुपर-4मध्ये पाकिस्तानने बांगलादेशचा दारुण पराभव केला. मात्र पुढील लढतीत हिंदुस्थाने पाकिस्तानला आसमान दाखवत 228 धावांनी विजय मिळवला. त्यानंतर अखेरच्या लढतीतही बाबरच्या संघाला श्रीलंकेने पराभवाचे पाणी पाजले आणि स्पर्धेतून घरचा रस्ता दाखवला.
चार वेगवान गोलंदाज फिट म्हणजे टीम इंडिया हिट, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे समाधानी
हिंदुस्थानला संधी
दरम्यान, आशिया चषकातील खराब कामगिरीमुळे पाकिस्तानचा संघ नंबर 3 वर घसरला आहे. तर हिंदुस्थानचा संघ नंबर 2 वर पोहोचला आहे. आज एकीकडे ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, तर दुसरीकडे हिंदुस्थान विरुद्ध बांगलादेश सामना रंगणार आहे. दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आणि हिंदुस्थानने बांगलादेशवर विजय मिळवल्यास तर क्रमवारीत उलटफेर होईल आणि रोहित शर्माचा संघ नंबर 1 वर पोहोचेल.
आयसीसी क्रमवारीतील पहिले पाच संघ
1. ऑस्ट्रेलिया – 118 पॉईंट
2. हिंदुस्थान – 116 पॉईंट
3. पाकिस्तान – 115 – पॉईंट
4. इंग्लंड – 103 पॉईंट
5. न्यूझीलंड – 102 पॉईंट