वर्ल्डकप जिंकताच बांगलादेशी खेळाडूंचे ‘असभ्य’ वर्तन; हिंदुस्थानी खेळाडूंना शिवीगाळ, धक्काबुक्की

9470

क्रिकेट हा सभ्य लोकांचा खेळ मानला जातो. मात्र दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम लढतीमध्ये बांगलादेशच्या खेळाडूंनी असभ्य वर्तन करून या खेळाला डाग लावला. यामुळे त्यांच्यावर क्रीडा क्षेत्रातून टिकेची झोड उठली आहे.

टीम इंडिया आणि बांगलादेश संघामध्ये रविवारी अंडर-19 विश्वचषकाचा अंतिम सामना रंगला. चुरशीच्या झालेल्या या लढतीत बांगलादेशने चार वेळच्या विजेत्या टीम इंडियाचा पराभव करत पहिल्यांदाच विश्वचषक उंचावला. मात्र विश्वचषक जिंकल्यानंतर बांगलादेशच्या खेळाडूंनी संतुलन गमावले आणि टीम इंडियाच्या खेळाडूंशी गैरवर्तन केले.

ind-v-ban

दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये भर मैदानातच ‘तू-तू-मै-मै’ झाली. बांगलादेशच्या खेळाडूंनी टीम इंडियाच्या खेळाडूंना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. यामुळे दोन्ही खेळाडू आमनेसामने आले. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बांगलादेशच्या खेळाडूंवर मोठी टिका सुरू झाली. यानंतर बांगलादेशच्या कर्णधाराने झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे.

अंतिम सामना सुरू झाल्यापासून बांगलादेशच्या खेळाडूंनी आपला आक्रमक बाणा दाखवला. पहिल्या षटकामध्येही टीम इंडियाच्या खेळाडूंमध्ये आणि बांगलादेशच्या गोलंदाजामध्ये बाचाबाची झाली. मात्र सामना जिंकल्यानंतर बांगलादेशच्या खेळाडूंनी संतुलन गमावले. बांगलादेशी खेळाडूंनी हिंदुस्थानच्या खेळाडूंनी शिवीगाळ केली. यावेळी दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये धक्काबुक्की झाली.

क्रीडा क्षेत्रातून टिकेची झोड उठल्यानंतर बांगलादेशचा कर्णधार अकबर अली याने माफी मागितली आहे. झालेला प्रकार दुर्भाग्यपूर्ण असल्याची प्रतिक्रिया अकबर अली याने दिली आहे. तसेच लढतीदरम्यानही बांगलादेशच्या खेळाडूंनी जाणीवपूर्वक टीम इंडियाच्या फलंदाजांना उकसावण्याचा प्रयत्न चालवला होता. प्रत्येक चेंडूनंतर गोलंदाज फलंदाजावर टिप्पणी करत होता. याबाबतही अकबर अली याने माफी मागितली असून अति उत्साहामध्ये हे घडल्याचे सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या