मुलगा बनून सराव करायची, आता सेहवाग स्टाईल फलंदाजी करत गाजवतेय वर्ल्डकप

1943

टीम इंडियाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग याचे नाव समोर येतात गोलंदाजांची त्रेधातिरपीट उडते. गोलंदाजांची झोप उडवणाऱ्या आणि चेंडूची शिलाई उधडून टाकणारा हा खेळाडू लिलया चौकार आणि षटकार लगावायचा. सेहवागच्या पावलावर पाऊल ठेऊन महिलांच्या आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळवलेल्या आणि ‘लेडी सेहवाग’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या खेळाडूची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

सचिन तेंडुलकरला आदर्श मानणारी आणि सेहवाग स्टाईल फलंदाजी करणाऱ्या या खेळाडूने आयसीसी महिला टी-20 वर्ल्डकपमध्ये धुमाकूळ घातला आहे. अवघ्या 16 वर्षांच्या या खेळाडूने दिग्गज गोलंदाजांची पिसे काढली आहेत. सलामीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर टीम इंडियाने दुसरा सामनाही आरामात जिंकला. दुसऱ्या लढतीत टीम इंडियाने बांगलादेशचा 18 धावांनी पराभव केला. या लढतीत सलामीवीर शेफाली वर्मा (Shefali Verma) हिने 17 चेंडूत धडाकेबाज 39 धावाची खेळी केली.

धडाकेबाज फलंदाजी
शेफाली वर्मा हिने ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशविरुद्ध निडर होत फलंदाजी केली. अॅलीस पेरी, जोनासन, सलमा खातून, पन्ना घोष आणि जहानारा आलम या गोलंदाजांची 16 वर्षीय शेफालीने दमदार धुलाई केली. विशेष म्हणजे आपल्या छोट्या कारकीर्दीमध्ये गोलंदाजांची कर्दनकाळ बनलेली शेफाली एकेकाळी क्रिकेटचा सराव करण्यासाठी मुलगा बनून जायची.

शेफालीचे रौद्ररुप
शेफाली हिने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 15 चेंडूत 29 धावांची खेळी केली होती. यात 5 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. त्यानंतर तिने बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या सामन्यात 17 चेंडूत 39 धावांची खेळी केली. यात 2 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता.

आपली प्रतिक्रिया द्या