हिंदुस्थानची उपांत्य फेरीत धडक; न्यूझीलंडवर सनसनाटी विजय

460

न्यूझीलंडसमोर अखेरच्या दोन षटकांत विजयासाठी 34 धावांचे आव्हान उभे ठाकले असताना ऍमेलिया कीर हिने पूनम यादव टाकत असलेल्या 19 व्या षटकात 18 धावांची लयलूट करीत सामना रंगतदार अवस्थेत आणला. त्यानंतर अखेरच्या षटकात न्यूझीलंडसमोर विजयासाठी 16 धावांचे आव्हान होते. हिंदुस्थानची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने चेंडू शिखा पांडे हिच्या हाती सोपवला. शिखा पांडेच्या पहिल्या पाच चेंडूंवर 11 धावा वसूल केल्यामुळे अखेरच्या चेंडूवर विजयासाठी न्यूझीलंडला 5 धावांची आवश्यकता होती, मात्र त्या चेंडूवर हेली जेन्सन धावचीत झाली. न्यूझीलंडला एक लेग बाय मिळाली. हिंदुस्थानचा महिला क्रिकेट संघ 3 धावांनी सामना जिंकला. याचसोबत हरमनप्रीत कौरच्या ब्रिगेडने टी-20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत अगदी रुबाबात धडक मारली. हा या स्पर्धेतला सलग तिसरा विजयही ठरला. अवघ्या 34 चेंडूंत 46 धावांची खेळी साकारणारी शफाली वर्मा ‘प्लेअर ऑफ दी मॅच’ ठरली.

किवींच्या फलंदाजांना अपयश

हिंदुस्थानच्या 134 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱया न्यूझीलंडच्या फलंदाजांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. रचेल प्रिस्टने 12 धावांची, कर्णधार सोफी डिव्हाईनने 14 धावांची, सुझी बेटस् हिने 6 धावांची खेळी केली. या तिघींनाही आपल्या फलंदाजीतील धमक दाखवता आली नाही. मॅडी ग्रीनने 24 धावांची, कॅटी मार्टिनने 25 धावांची खेळी करीत थोडीफार झुंज दिली. ऍमेलिया कीर हिने सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करीत नाबाद 34 धावांची खेळी केली आणि न्यूझीलंडला विजयाची स्वप्ने दाखवली, पण अखेरचा विजयी पंच देण्यात त्यांना यश लाभले नाही. दीप्ती शर्मा, शिखा पांडे, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव व राधा यादव यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

शफाली पुन्हा चमकली पण…

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर शफाली वर्माने 46 धावांची खेळी साकारली. या खेळीत तिने 3 खणखणीत षटकार व 4 दमदार चौकारांची बरसात केली. पुनरागमन करणाऱया स्मृती मंधानाने 11 धावा केल्या, मात्र या लढतीत हिंदुस्थानच्या मधल्या फळीला पुन्हा एकदा अपयश आले. तानिया भाटीया (23 धावा), जेमिमा रॉड्रिग्स (10 धावा), हरमनप्रीत कौर (1 धाव), दीप्ती शर्मा (8 धावा) यांच्याकडून निराशा झाली. त्यामुळे हिंदुस्थानला 20 षटकांमध्ये 8 बाद 133 धावाच करता आल्या. रोझमेरी मेयर व ऍमेलिया कीर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

चुकांची पुनरावृत्ती नको – हरमनप्रीत

आमच्या फलंदाजांकडून याही लढतीत चूक झाली. सलामीवीर शफाली वर्माने छान सुरुवात करून दिल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांना आपला ठसा उमटवता आला नाही. यापुढे महत्त्वाच्या लढती असणार आहेत. बाद फेरीच्या लढतीत अशा चुका करून चालणार नाही, असे स्पष्ट मत हिंदुस्थानची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने यावेळी व्यक्त केले.

आपली प्रतिक्रिया द्या