टीम इंडिया-ऑस्ट्रेलियात रंगणार महिला टी-20 वर्ल्डकपचा अंतिम सामना

5065

यजमान ऑस्ट्रेलियाने उपांत्या फेरीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत अंतिम फेरीत धडक दिली आहे. यजमान संघाने दक्षिण आफ्रिकेचा रोमहर्षक लढतीत पाच धावांनी पराभव करत फायलन गाठली. फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना स्पर्धेतील अपराजित संघ टीम इंडियाशी होणार आहे. अंतिम सामना आठ मार्चला रंगणार आहे. हिंदुस्थानसाठी जमेची बाब हिच की ग्रुप स्टेजमध्ये हरमनप्रीत कौरच्या संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता.

गुरुवारी पावसामुळे हिंदुस्थान आणि इंग्लंडमधील उपांत्यफेरीचा पहिला सामना रद्द करावा लागला. यामुळे हिंदुस्थानला थेट फायनलमध्ये प्रवेश मिळाला. दुसरी लढत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये रंगली. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 134 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मेग लॅनिंगने नाबाद 49 धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाचा डाव संपल्यानंतर सिडनीमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात झाली. पाऊस थांबल्यानंतर डकवर्थ ल्यूईसच्या नियमानुसार दक्षिण आफ्रिकेपुढे 13 षटकांमध्ये 98 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. परंतु दक्षिण आफ्रिकेचा संघ 13 षटकांमध्ये 5 बाद 92 धावाच करू शकला आणि ऑस्ट्रेलियाने 5 धावांनी सामना जिंकला.

तत्पूर्वी ‘अ’ गटात अव्वल असलेला हिंदुस्थान आणि ‘ब’ गटात दुसऱ्या स्थानावर असलेल्या इंग्लंड यांच्यात पहिली उपांत्य लढत होणार होती. परंतु टीम इंडिया व बलाढ्य इंग्लंडमध्ये होणारा सेमीफायनल सामना पावसामुळे रद्द झाला. गुणतालिकेत सर्वाधिक गुण असल्याने टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली आहे. टीम इंडियाने पहिल्यांदाच टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

शेफाली वर्माचा फॉर्म महत्त्वाचा
अंतिम फेरीमध्ये हिंदुस्थानसाठी 16 वर्षी खेळाडू शेफाली वर्माचा फॉर्म महत्त्वाचा ठरणार आहे. ग्रुप स्टेजमध्ये शेफालीने सलामीला खेळताना प्रत्येक लढतीत टीम इंडियाला चांगला स्टार्ट दिला आहे. शेफालीने जवळपास प्रत्येक लढतीमध्ये तीसपेक्षा जास्त धावा चोपल्या आहेत. तिला अर्धशतक झळकावण्यात यश आले नसले तरी दोन वेळा तिने 45 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. या कामगिरीमुळे आयसीसीच्या महिला टी-20 क्रमवारीत ती पहिल्या स्थानावरही पोहोचली आहे. तिच्या खात्यात सध्या 761 अंक आहेत. फायनलमध्येही ती आपल्या बॅटचा तडाखा ऑस्ट्रेलियाला देईल अशी क्रीडाप्रेमींना आशा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या