सुपर से उपर! महिला खेळाडूने घेतला वर्ल्डकपमधील अविश्वसनिय कॅच, पाहा व्हिडीओ

1351

ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या महिला टी-20 वर्ल्डकपमध्ये शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेने दुबळ्या थायलंडचा 113 धावांनी पराभव केला आणि एका मोठ्या विजयाची नोंद केली. या लढतीत दक्षिण आफ्रिकेची फलंदाज लिजेले ली हिने शतकी खेळी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यासह थायलंडच्या डावादरम्यान घडलेल्या एका घटनेमुळेही हा सामना क्रीडाप्रेमींच्या कायम लक्षात राहणार आहे.

क्षेत्ररक्षण म्हटले की आपल्यासमोर दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू जॉन्टी ऱ्होड्स यांचे नाव समोर येते. जॉन्टी ऱ्होड्स यांचा वारसाच दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघातील खेळाडूही पुढे चालवत आहेत. शुक्रवारी थायलंडविरुद्ध झालेल्या लढतीत आफ्रिकन खेळाडू लॉरा वॉलवार्ट (Laura Wolvaardt) हिने एक अविश्वसनिक झेल घेतला. एकवेळ फलंदाजालाही आपण बाद झालोय यावर विश्वास बसला नाही. मात्र लॉराने हा कॅच एवढ्या सहजपणे घेतला की अखेर फलंदाजाला पवेलियनचा रस्ता पकडावा लागला.

आफ्रिकेने दिलेल्या पहाडाएवढ्या आव्हानाच पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या थायलंडच्या संघाला सुरुवातीला धक्के बसले. या धक्क्यातून सावरत असतानाच सातव्या षटकात लॉराने अप्रतिम कॅच घेत विरोधी संघाला आणखी संकटात टाकले. नॉनकुलेको मलाबा हिच्या सातव्या षटकातील पहिल्या चेंडूवर थायलंडची खेळाडू सोरनारिन टिपोच हिने एक कव्हर्सच्या दिशेने फटका मारला. चेंडू सीमारेषेकडे झेपावत असताना लॉराने सूर मारत कॅच घेतला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लॉराचे कौतुक होत आहे. आयसीसीने देखील याची दखल घेत आपल्या ट्विटर हँडलवरून या कॅचचे जीआयएफ शेअर केले आहे.

आफ्रिकेला विजय
प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 20 षटकात 3 विकेट्स गमावून 195 धावा केल्या. आफ्रिकेकडून लिजेले ली हिने 101 धावांची शतकी खेळी केली. यासह लूस हिने नाबाद 61 धावा चोपल्या. यानंतर थायलंडच्या संघाला 19.1 षटकात 82 धावांमध्ये बाद करत 113 धावांनी पराभव केला. आफ्रिकेकडून मलाबा हिने 4 षटकात 4 विकेट्स घेतल्या. तर फलंदाजीमध्ये कमाल दाखवलेल्या लूस हिने 3 षटकात 17 धावा देत 3 बळी मिळवले.

आपली प्रतिक्रिया द्या