
सध्या हिंदुस्थानात ‘आयपीएल’चे वारे वाहत असले, तरी हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींना वेध लागले आहेत ते पुढील महिन्यात होणाऱया ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’च्या अंतिम सामन्याचे. एकीकडे हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया हे अंतिम सामन्याच्या तयारीला लागले असून, या अंतिम सामन्यापूर्वी ‘आयसीसी’ने बक्षिसांची घोषणा केली असून, विजेत्या आणि उपविजेत्यांवर कोटय़वधींच्या बक्षिसांची उधळण केली आहे.
इंग्लंड येथील ओव्हल क्रिकेट मैदानावर 7 ते 11 जून या कालावधीत हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. गतवर्षी हिंदुस्थानचे हे विजेतेपद पटकाविण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले होते. त्यामुळे यंदाच्या वर्षीचा हा मानाचा किताब पटकाविण्यासाठी हिंदुस्थानी संघ सज्ज झाला आहे.
या अंतिम सामन्यापूर्वी ‘आयसीसी’ने बक्षिसाची रक्कम जाहीर केली असून, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात विजेत्या संघाला 13.23 कोटी , तर उपविजेत्या संघाला 6.61 कोटी रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. ‘आयसीसी’ने आपल्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट करीत याबाबत घोषणा केली आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी संभाव्य संघ
हिंदुस्थान : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, के.एस. भरत (यष्टिरक्षक), ईशान किशन (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट. स्टॅण्डबाय खेळाडू : ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव.
ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (क), स्कॉट बोलॅण्ड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन, मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), मिचेल स्टार्क आणि डेव्हिड वॉर्नर.