गुगलवर उपलब्ध होणार संस्कृत शब्दांचे हिंदी आणि इंग्रजी भाषांतर

संस्कृत शब्द वाचणे आणि समजणे आता अधिक सोपे होणार आहे. कारण इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन (ICCR) ने गुरुवारी इंटरनेटवर संस्कृत समजून घेणे सोपे होण्यासाठी Google सोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या अंतर्गत, संस्कृतमधील सामान्यतः वापरल्या जाणार्‍या एक लाख ओळी, त्यांच्या इंग्रजी आणि हिंदी अनुवादांसह उपलब्ध असणार आहेत. ICCR चे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे आणि Google च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

यावेळी सहस्रबुद्धे म्हणाले की, ICCR आणि Google संस्कृत भाषांतराचा अनुभव सुधारण्यासाठी एकत्र येत सहकार्य करत आहेत. यामुळे Google ला मशीन लर्निंग तंत्रज्ञानामध्ये सुधारणा करून संस्कृतचे विविध भाषांमध्ये भाषांतर करण्यासाठी आणि इतर भाषांमधील संस्कृत सामग्री तयार करण्यास मदत होईल.

ते म्हणाले की, ‘संस्कृत ही केवळ हिंदुस्थानातील एक भाषा नाही, तर ती हिंदुस्थानचा आत्मा असून ज्ञान समजून घेण्याचा मार्ग देखील आहे. संस्कृत भाषा आणि साहित्यात ज्ञानाचा मोठा खजिना आहे. या प्रकल्पाच्या प्रायोगिक टप्प्यात, ICCR ने त्यांच्या हिंदी आणि इंग्रजी अनुवादांसह एक लाख ओळी Google सोबत शेअर केल्या आहेत.