बँकेचा बोजा नसल्याचा इचलकरंजी अर्बन बँकेचा बनावट सहीचा बनावट दाखला, आयसीआयसीआय बँक कर्मचाऱयांचे संगनमत आणि नगरपालिकेचा बनावट बांधकाम परवाना आदींच्या साहाय्याने 9 कोटी 99 लाख 90 हजार रुपयांचे कर्ज काढून सख्ख्या भावाने फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत फिर्याद दाखल झाली आहे.
शीतल आदिनाथ केटकाळे व वैशाली शीतल केटकाळे (दोघे रा. नमोकार बिल्डिंग, कोल्हापूर रोड) यांच्या विरुद्ध अजितकुमार आदिनाथ ऊर्फ आदिशा केटकाळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा पोलिसांत दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अजितकुमार यांचे भाऊ शीतल केटकाळे यांनी लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या सन्मती प्रीसिजन इंजिनीअरिंग प्रा. लि. या फर्मवर वेगवेगळी अशी 9 कोटी 99 लाख 90 हजार रुपयांची तीन कर्जे काढली आहेत. या कर्जाच्या मंजुरीसाठी शीतल यांनी अजितकुमार, आदिनाथ आणि स्वतःच्या नावे सामाईक असलेले महापालिका हद्दीतील गट क्र. 164 मधील प्लॉट नंबर 1, 2 व 3 हे तारण ठेवले आहेत. या प्लॉटवर इचलकरंजी अर्बन बँकेचा बोजा असताना, शताल यांनी बनावट ना-हरकत दाखला तयार करून त्यावर बँकेचा बनावट शिक्का व मॅनेजरची बनावट सही करून त्याचा वापर करून बनावट बक्षीसपत्र तयार करण्यासाठी केला. तसेच आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीच्या बँक कर्मचाऱयांशी संगनमत करून बँकेच्या सर्च रिपोर्टमध्ये प्लॉट नंबर 1, 2, 3 हे प्लॉट 1985 सालच्या प्रोव्हिजन ले आउट (सुधारित रेखांकन) मध्ये ते शीतल यांच्या नावे असल्याचा बनावट रिपोर्ट तयार करून घेतला. तसेच घराच्या पहिल्या मजल्याचा बांधकाम परवाना शीतल यांच्या नावे असल्याचे दाखविण्यासाठी इचलकरंजी नगरपालिकेचा बनावट बांधकाम परवाना तयार करून त्यावर नगरपालिकेचा बनावट शिक्का व मुख्याधिकारी यांची स्वाक्षरी करून परवाना तयार केला. याद्वारे सामाईक मिळकतीवर 9 कोटी 99 लाख 90 हजार रुपयांचे कर्ज काढले. सामाईक मालमत्ता लुबाडण्याच्या उद्देशाने फसवणूक केल्याप्रकरणी शीतल केटकाळे व वैशाली केटकाळे यांच्या विरुद्ध अजितकुमार केटकाळे यांनी फिर्याद दिली आहे.