कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती, हिंदुस्थानचा मोठा विजय

38

सामना प्रतिनिधी । हेग

पाकिस्तानी लष्कराने फाशीची शिक्षा सुनावलेले हिंदुस्थानचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या फाशीला आज आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली. त्याचबरोबर जाधव यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी वकील न दिल्याने पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केले आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. या निर्णयामुळे पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर झटका बसला, तर हिंदुस्थानचा मोठा विजय झाला.

हिंदुस्थानसह जगभरात जल्लोष

कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती देण्याच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयामुळे हिंदुस्थानसह जगभरातील हिंदुस्थानींनी जल्लोष साजरा केला. दरम्यान, हा सत्य आणि न्यायाचाच विजय आहे. मला खात्री आहे, जाधव यांना नक्कीच न्याय मिळेल, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.

काय आहे पार्श्वभूमी

नौदलातून निवृत्त झालेले कुलभूषण जाधव व्यावसायानिमित्त इराणला गेले असताना पाकिस्तानी लष्कराने त्यांचे 3 मार्च 2016 ला अपहरण केले. हेरगिरी आणि दहशतवादी कारवाया करत असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवत त्यांना बलुचिस्तानमधून अटक केल्याचे दाखवले. त्यांच्यावर लष्करी न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा ठोठावली.

15 पैकी 14 मतांनी विजय

कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्याबाबत घेण्यात आलेल्या न्यायालयातील मतदानात 15 पैकी 14 मते जाधव यांच्या पारड्यात पडली. केवळ 1 मत विरोधात पडले. त्यामुळे पाकिस्तानला चांगलीच चपराक बसली.

आपली प्रतिक्रिया द्या