शरीरातील अँटीबॉडी कमी झाल्यास पुन्हा कोरोना संक्रमणाचा धोका; आयसीएमआरचा इशारा

कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाने जगाची चिंता वाढत आहे. तसेच कोरोनाबाबत होणाऱ्या संशोधनातून नवीन बाबी समोर येत आहेत. त्यातील काही चिंता वाढवणाऱ्या आहेत. तर काही संशोधनामुळे दिलासा मिळत आहे. कोरोनाबाबत चिंता वाढवणारा असाच एक इशारा आयसीएमआरने दिला आहे. कोरोना संक्रणाचा पुन्हा धोका असल्याचे आयसीएमआरने म्हटले आहे.

कोरोनाचे पुन्हा संक्रमण होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येत नाही. मात्र, त्यात तथ्य नसल्याचे आयसीएमआरने स्पष्ट केले आहे. शरीरातील अँटीबॉडी कमी झाल्यास संक्रमणाचा धोका असतो, असे आयसीएमआरने म्हटले आहे. कोरोनाचे संक्रमण झाल्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांच्या शरीरात कोरोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी अँटीबॉडी तयार होतात. या अँटीबॉडीमुळे कोरोनाचे पुन्हा संक्रमण होण्यापासून बचाव होतो. या अँटीबॉडी शरीरात नेमक्या कितीकाळ राहतात, याबाबत संशोधकांमध्ये मतभेद आहेत. मात्र, काही काळानंतर शरीरातील अँटीबॉडी कमी होत असल्याचे दिसून आले आहे.

सुमारे तीनचार महिन्यानंतर या अँटीबॉडी कमी होण्यास सुरुवात होते. शरीरातील कोरोनाविरोधातील अँटीबॉडी कमी झाल्यास पुन्हा कोरोना संक्रमणाचा धोका वाढतो, असा इशारा आयसीएमआरने दिला आहे. त्यामुळे सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे. कोरोना नवीन व्हायरस असून त्याबाबत संशोधन सुरू आहे. त्यातून नवीन माहिती मिळत आहे, असे आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले. आतापर्यंत झालेल्या संशोधनात कोरोनाविरोधातील अँटीबॉडी शरीरात राहण्याचा काळ संशोधकांनी वेगवेगळा सांगितला आहे.

तीन ते सात महिन्यांपर्यंतचा हा काळ सांगण्यात आला आहे. याबाबत अधिक संशोधन सुरू आहे. मात्र, शरीरातील अँटीबॉडी कमी झाल्यावर पुन्हा कोरोना संक्रमणाचा धोका वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनाचे पुन्हा संक्रमण होणार नाही, असे समजून अनेकजण गाफील राहतात. मात्र, अँटीबॉडी संपल्यावर कोरोना संक्रमणाचा धोका असल्याने सतर्क राहण्याची गरज डॉ. भार्गव यांनी व्यक्त केली.

चीन, युरोप, अमेरिका आणि रशियासह काही देशात शरीरातील कोरोनाविरोधातील अँटीबॉडीबाबत संशोधन करण्यात येत आहे. त्यात अँटीबॉडी किती काळ शरीरात राहतात, याचा अभ्यास प्रामुख्याने करण्यात येत आहे. या संशोधनांचे निष्कर्ष डिसेंबर महिन्यापर्यंत यतील. इतर देशात आणि हिंदुस्थानातही पुन्हा कोरोना संक्रमण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे गाफील राहू नये, कोरोनाबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे डॉ. भार्गव यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या