आयसीएमआरकडून लस आल्यावर आरोग्य कर्मचार्‍यांचा प्राधान्याने विचार केला जाणार- राजेश टोपे

कोरोना महामारीने जगभरात चित्र बदलले असून आयसीएमआरकडून लस आल्यावर पहिल्यांदा आरोग्य कर्मचार्‍यांचा प्राधान्याने विचार केला जाणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. आरोग्यमंत्री राजेश टोपे हे जनता दरबार या उपक्रमाला प्रदेश कार्यालयात उपस्थित होते. त्यावेळी राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

केंद्रसरकारच्यावतीने आयसीएमआरकडून काही सूचना आरोग्य विभागाला आल्या आहेत. लस साठयाची पूर्वतयारी चांगल्यापध्दतीने केली जात आहे. लस कोल्डचा जो विषय असतो तो कोल्ड स्टोरेजचे डिस्ट्रीब्युटर त्यांच्यापर्यंत कसे जाता येईल आणि कोणत्या गोष्टीवर मेंटेन करता येईल त्यांचा एक एसओपी आलेला आहे तो मेंटेन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सध्या ट्रेनिंग देण्याचे काम सुरू केले आहे. ऐनवेळी लस आल्यावर धावपळ करण्यापेक्षा पूर्वतयारी करण्यासाठी राज्य सरकार आणि आरोग्य विभाग सज्ज झाला आहे असेही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

सध्या खाजगी आणि सरकारी आरोग्य कर्मचारी यांचा डाटा तयार करण्याचे काम एका सॉफ्टवेअरमध्ये तयार करुन त्यामध्ये माहिती भरण्याचे ट्रेनिंग दिले जात आहे. ज्यावेळी लस येईल त्यावेळी या डाटाचा उपयोग होईल असेही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

यावेळी लोकांना किफायतशीर दरात एन – ९५ हा मास्क उपलब्ध करून दिला जाणार असल्याचा शासन आदेश काढल्याचेही सांगतानाच आरोग्य विभागामार्फत कोरोना नियंत्रणासाठी कोणत्याप्रकारे काम यंत्रणा करत आहे हेही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या