पालिकेच्या नऊ रुग्णालयांत आयसीयू

सामना प्रतिनिधी । मुंबई

पालिकेच्या नऊ उपनगरी रुग्णालयांत स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने १४८ आयसीयू बेडची सुविधा देण्यात येणार आहे. १२ रुग्णालयांत ही सुविधा देण्यासाठी प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आले होते, मात्र विरोधकांनी राजकारण केल्यामुळे तीन रुग्णालयांना ही सुविधा मिळू शकणार नाही.

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांत निवासी डॉक्टरांची कमतरता असल्यामुळे स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून अतिदक्षता विभागाचे २०० बेड निर्माण करण्याबाबतचे प्रस्ताव आज स्थायी समितीसमोर मांडण्यात आले होते, मात्र भाजपसह विरोधी पक्षानेही हा राजकारण केल्यामुळे तीन रुग्णालयांचा पहिला प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही. मात्र उर्वरित नऊ रुग्णालयांसाठीचे प्रस्ताव अध्यक्ष यशवंत जाधव यांनी विरोधकांना गुंगारा देऊन मंजूर केले. पालिकेच्या रुग्णालयांत येणाऱया बाह्य रुग्णांना आयसीयूची सुविधा देण्यासाठी हे प्रस्ताव मंजूर करणे आवश्यक असल्याची बाजू सडेतोडपणे शिवसेनेच्या राजुल पटेल यांनी मांडली.

निवासी डॉक्टरांच्या जागा आठ महिन्यांत भरणार
पालिकेच्या रुग्णालयांत निवासी डॉक्टरांच्या ३३ जागा असून त्या रिकाम्या आहेत. त्यामुळे आयसीयू बेड वाढवता येते नव्हते अशी माहिती यावेळी अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी दिली. त्यावेळी या जागा लवकर भरण्याचे आश्वासन द्या अशी मागणी शिवसेनेचे रमेश कोरगावकर यांनी केली. त्यावर या जागा आठ महिन्यांत भरणार असल्याचे आशवासन सिंघल यांनी दिले.

रुग्णालय आणि बेड
– डॉ. सिद्धार्थ रुग्णालय गोरेगाव (१२)
– डॉ. आंबेडकर रुग्णालय, कांदिवली (३०)
– भगवती रुग्णालय, बोरिवली (१०)
– राजावाडी रुग्णालय, घाटकोपर (२१)
– के. बी. भाभा रुग्णालय, कुर्ला (१०)
– संत मुक्ताबाई रुग्णालय, घाटकोपर (१०)
– एम. एम. मालविय रुग्णालय, गोवंडी (२०)
– के. एम. जे. फुले रुग्णालय, विक्रोळी (१०)
– एम. टी अग्रवाल रुग्णालय, मुलुंड (२५)