हिंदूंच्या अस्तित्वासाठी हिंदू राष्ट्र

<<सुनील लोंढे>>

हिंदुत्ववादी नेते मंडळी तसेच संघटनांकडून ‘हिंदू राष्ट्रा’ची मागणी वारंवार होत आहे. निधर्मी हिंदुस्थानच्या शासन प्रणालीमध्ये पहिल्यांदा व्यापक प्रमाणात, धाडसाने ‘हिंदू राष्ट्राची मागणी करण्यात येत आहे. यापूर्वी स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, स्वातंत्र्यवीर सावरकर, गोळवलकर गुरुजी अशा थोर पुरुषांनी धर्माधिष्ठत ‘हिंदू राष्ट्र’ स्थापन होण्यासाठी चिंतिले. ‘हिंदू राष्ट्र’ म्हटल्यावर काही जणांच्या भुवया उंचावतात. त्यांच्या मनात संशय, भीती निर्माण होते. हिंदू राष्ट्र म्हणजे वर्णव्यवस्था, मनुस्मृती, जातिव्यवस्था, स्त्रियांना व दलितांना हीन वागणूक इतर पंथियांवर धार्मिक आचरण करण्यास कडक बंधने लादली जातील अशी अनावश्यक भीती काहींना वाटते. राष्ट्र जर धर्मावर आधारित असेल तर ते किती मागासलेले राहाते याचे उदाहरण म्हणून पाकिस्तानकडे बोट दाखवले जाते.

मुळात जगात १५२ ख्रिस्ती, ५२ मुसलमान, १२ बौद्ध, १ जू अशी राष्ट्रे आहेत. असे वाचनात आले. ही राष्ट्रे धर्मावर आधारित असूनही त्यांनी प्रगती केलेली आहे. परंतु हिंदुस्थानात मात्र धर्म नको अशी भूमिका घेतली जाते. याला कारण एक हत्ती आणि सहा आंधळे या गोष्टीप्रमाणे ‘धर्म’ या शब्दाचे अज्ञान. धर्मास तात्त्विक बैठक असते. तो चिरकाल टिकणारा संस्कार आहे. समाजव्यवस्था उत्तम राखून प्रत्येक प्राणिमात्राची व्यावहारिक आणि आध्यात्मिक उन्नती ज्यायोगे साध्य करता येते त्याला धर्म म्हटले जाते. धर्म म्हणजे कर्तव्य. मनुष्याने शुद्ध, स्वच्छ, नीतीनियमांना धरून आचरण करणे म्हणजे धर्म होय. यामुळे मनुष्य स्वतःचा अभ्युदय साधू शकतो. धर्म पाप, पुण्य, धर्माचरण इत्यादी संदर्भात शिकवतो. ईश्वरप्राप्तीसाठी व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधना मार्ग दाखवतो. त्यामुळे व्यक्ती सात्त्विक बनते. तिच्या मनात चुकीची गोष्ट करण्याचा विचार येत नाही. ती पापभिरू बनते.

जेव्हा लोक अज्ञानी आणि स्वाभिमानशून्य बनतात तेव्हा ते त्यांच्यासारखाच नेता निवडतात. तेही त्या लोकांसारखे असतात. अशा नेत्यांनी देशाला कंगाल केले. लोकशाहीचा त्यांनी कसा खेळखंडोबा केला हे स्पष्ट होते. हिंदूंनी त्यांच्या पूर्वजांनी दिलेला ज्ञान, धर्म, संस्कृती, तत्त्वज्ञान, आचार, कला, आयुर्वेद, तीर्थक्षेत्रे, शस्त्रविद्या आदींचा ठेवा उधळून लावल्याने आज हिंदूंची स्थिती सर्वच क्षेत्रांत दयनीय झाली आहे. हिंदू धर्मात साधनेस (ईश्वर भक्ती) महत्त्व असल्याने साधनेने मनुष्याचे दिव्य चक्षू जागृत होतात. त्यामुळे शारीरिक, मानसिक दुःखावर लाखो रुपये खर्च करूनही उपाय न सापडलेल्या विज्ञानाला अध्यात्म शास्त्राकडे वळावे लागते. प्राणावाचून जसे शरीर तसे धर्मावाचून (पंथावाचून नव्हे) राष्ट्र. हिंदुस्थानच्या सर्व समस्यांवर उपाय म्हणून हिंदू राष्ट्राची मागणी केली जात आहे. संत कबिराचे ‘एक साधे सब साधे, सब साधे सबजाय,’ असे एक वचन असून एक साध्य केले असता सर्व साध्य होते आणि सर्वच साध्य करण्याचा प्रयत्न केल्यास काहीच साध्य होत नाही असा त्याचा अर्थ आहे. थोडक्यात, अनेक गोष्टी साध्य करण्यात वेळ, श्रम वाया घालवण्यापेक्षा एकच उतुंग ध्येय ठेवून त्यायोगे बाकीची ध्येयं साध्य होतील, असे बघावे. ‘हिंदू राष्ट्र’ स्थापन हे एक साध्य केले असता सर्व साध्य होईल. आतापर्यंत प्रभू श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज, सम्राट चंद्रगुप्त यासारखा एकही राज्यकर्ता लोकशाहीस लाभलेला नाही. राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश असायचा. त्यामुळे संपूर्ण विचारांती योग्य निर्णय घेतले जाऊन त्यांची अंमलबजावणी होत असे. पूर्वी हिंदूंची ‘कुन्वणतो विश्वा आर्याम’ म्हणजे जगाला सुसंस्कृत बनवू अशी घोषणा होती. अन्य पंथियांना त्यांच्या प्रार्थनास्थळांतून मिळणारे, परंतु सध्या हिंदूंना दुरापास्त असलेले धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे. भाषा, प्रांत आदी भिन्न असूनही केवळ ‘हिंदू धर्मसमान आहे’, याच धाग्यामुळे विविध राज्यांत एकत्व होते. पण त्या एकत्वास ग्रहण लागणे देशासाठी ते सुचिन्ह नाही. ते टाळण्यासाठी म्हणजे हिंदुस्थानचे, हिंदू धर्माचे आणि स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी ‘हिंदू राष्ट्र’ निर्मिती आवश्यक आहे.