व्होडाफोन, आयडियाचे विलीनीकरण, देशातील सर्वात मोठी नवी कंपनी ठरणार

30

सामना ऑनलाईन, मुंबई

ब्रिटिश टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आणि आदित्य बिर्ला समूहाची आयडिया या मोबाईल क्षेत्रातील कंपन्यांनी आज एकमेकांमध्ये विलीनीकरणाची घोषणा केली. येत्या दोन वर्षांत हे विलीनीकरण पूर्ण होईल. विलीनीकरणानंतर कुमारमंगलम बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली नवी कंपनी काम करणार असून देशातील सर्वाधिक ग्राहक असलेली टेलिकॉम कंपनी ठरणार आहे.

नव्या कंपनीत व्होडाफोनकडे ४५ टक्के तर आयडियाकडे २६ टक्के भागीदारी असणार आहे. अध्यक्ष नियुक्तीचा अधिकार केवळ आयडियाकडे तर नव्या कंपनीचे सीएफओ नियुक्तीचे अधिकार व्होडाफोनकडे असणार आहेत. कंपनीच्या बोर्डात १२ संचालक असून दोन्ही कंपन्यांमध्ये ३-३ संचालक असतील. सहा स्वतंत्र संचालकही कार्यरत असतील.
सर्वाधिक ३८ कोटी ग्राहक असलेली कंपनी

व्होडाफोनकडे हिंदुस्थानात सध्या २०.०२८ कोटी तर आयडिया सेल्यूलरकडे १८.७७ कोटी ग्राहक आहेत. विलीनीकरणानंतर नवी कंपनी ही देशातील सर्वाधिक ३८ कोटी ग्राहक असलेली कंपनी ठरणार आहे. एअरटेल आणि रिलायन्स जियो या कंपन्यांनाही ती मागे टाकेल. नव्या कंपनीचा महसूल सुमारे ८० हजार कोटींवर जाण्याचा अंदाज आहे. सध्या देशात एअरटेलकडे सर्वाधिक २६.३४ कोटी ग्राहक आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या