वाऱ्याचा वेग ताशी 70 किमी झाला तर वैतरणावरील रेल्वे वाहतूक थांबवणार

812

पश्चिम रेल्वेच्या पालघर परिसरात वादळामुळे हानी होण्याची शक्यता वर्तवली असल्याने रेल्वेचे वैतरणा नदीवरील तसेच अन्य रेल्वे पुलांवर हवेचा वेग मोजणारी ‘एनेमोमीटर’ यंत्रणा बसविण्यात आली आहे. वारा दरताशी ७० कि.मी.वेगाने जरी वाहू लागला तरी या मशिनच्या माध्यमातून खाडी पुलावरून जाणा-या रेल्वे गाड्या जागच्या जागी थांबविण्यात येणार असल्याचे पश्चिम रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

निसर्ग चक्रीवादळामुळे वादळामुळे दरताशी १२० ते १२५ कि.मी. वेगाने वारा वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे भाईंदर, वैतरणा खाडी – नदीच्या पुलावरून जाणारी ट्रेनच्या सुरक्षेकरीता भाईंदर कंट्रोल टॉवर येथे हवेचा वेग मोजण्यासाठी एनेमोमीटर मशीन्स बसविण्यात आल्या आहेत. तसेच पावसाचे प्रमाण मोजण्यासाठी ‘रेन गेज मीटर’ देखील बसविण्यात आले आहेत. त्यामुळे अटीतटीच्या क्षणी निर्णय घेण्यास मदत होणार आहे. गेल्या २४ तासांपासून रेल्वे स्थानके आणि मोठ्या कारखान्यांवर ताडपत्री अंथरून त्यांना सुरक्षा पुरविण्यात आली आहे. तसेच पुलावरील कोणत्याही लूज झालेल्या मटेरियलना भक्कम करण्यात आले आहे. होर्डिंग्ज, बॅनर, ताडपत्री अशा वस्तूंमध्ये रिकाम्या जागांमध्ये हवा शिरून त्या कोसळू नये म्हणून विशेष खबरदारी घेतली गेली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून रेल्वेने रूळांशेजारील मोठी झाडे आणि डोंगर बोगदे यातील कोसळू शकणारे बोल्डर हटविले आहेत. मोठे पुलांचे पुन्हा सुरक्षा इन्स्पेक्शन करण्यात आले असून खाजगी व्यक्तींकडूनही जेसीबी, हायड्रो, पोकलेन मशिन मागवून सुसज्ज ठेवण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या