बाहेरील उमेदवार दिला तर तो पाडा; काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कडाडले

काँग्रेसच्या  वरिष्ठ मंडळींना सिंधुदुर्ग संघटनेबाबत अभ्यास नाही.  काँग्रेसचे आतापर्यंत एवढे मंत्री झाले पण सिंधुदुर्गात पक्षाचे एक साधे कार्यालय होवू शकले नाही.  आता आम्ही पुष्पसेन सावंत, प्रकाश जैतापकर यांच्या कार्यालयात बसून पक्षाची काम करतो.  ते उद्या आणखी कुठल्या पक्षात गेले तर आमचं दुकान बंद.  ही आमची शोकांतिका आहे.  आता यापुढे पक्षाने कुणी बाहेरची व्यक्ती उमेदवार म्हणून दिल्यास त्याला पाडा, असे आवाहन राष्ट्रीय काँग्रेसचे कुडाळ तालुकाध्यक्ष आबा मुंज यांनी करून आपल्या भावनांना काँग्रेस प्रदेश सरचिटणीस राजन भोसले यांच्या समोर वाट मोकळी करून दिली.  यावेळी उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून त्यांना प्रतिसाद दिला.

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा मेळावा कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे सोमवारी संपन्न झाला.  यावेळी व्यासपिठावर काँग्रेस प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विकास सावंत, नवीनचंद्र बांदिवडेकर, माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण, माजी आमदार पुष्पसेन सावंत, प्रकाश जैतापकर, बाळा गावडे, विद्याप्रसाद बांदेकर, तालुकाध्यक्ष आबा मुंज, अँड. दिलिप नार्वेकर, नीता राणे, उल्हास मंचेकर, दादा परब, राजु मसुरकर, देवानंद लूडबे, एम. एम. सावंत, श्रीकृष्ण तळवडेकर, नागेश मोर्ये, इरशाद शेख, कौस्तुभ सावंत, मंदार शिरसाट, सर्फराज नाईक आदी उपस्थित होते.

प्रदेश सरचिटणीस राजन भोसले म्हणाले की, काँग्रेस पक्षाचे विचार कधीच संपत नाहीत. काही जण काँग्रेस पक्षात आले, मोठे झाले आणि आज ते सोडून गेले.  पण त्यांची काय परिस्थिती आहे, हे आपण सर्वजण पाहतच आहात, असे भोसले यांनी सांगून काँग्रेसमधून बाजूला झालेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. आपल्या पक्षाकडून संघटनात्मक कामांबाबत काही चुका झाल्या असतील तर त्या चुका पक्षाकडून निश्चितच सुधारल्या जातील.  विशेष म्हणजे या विधानसभा निवडणुकीत आपल्या सर्वांना सर्वसामान्य असा उमेदवार दिला जाईल, असे सांगून त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम ठेवला.

लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच काँग्रेस पक्षाचा मेळावा संपन्न झाला.  अपेक्षेप्रमाणे काँग्रेस पक्षाकडून जिल्हा काँग्रेस संघटनेकडे वरिष्ठ पातळीवरून कुणीच लक्ष देत नसल्याबाबत तालुका पातळीवरून प्रमुख पदाधिकार्‍यांनी आपला संताप व्यक्त करत काँग्रेस प्रदेश सरचिटणीस राजन भोसले यांचे लक्ष वेधले.  यावेळी जिल्हाध्यक्ष विकास सावंत म्हणाले की, काँग्रेस पक्षाने अनेक स्थित्यंतरे बघितली आहेत.  त्या स्थित्यंतराचा मी साक्षीदार आहे.  मला यापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनेक ऑफर दिल्या मात्र मी गेलो नसल्याचे सांगत मी तत्वाने वागणारा आहे.  पक्ष सोडून जात आहेत ते पक्षात तात्पुरते होते त्यांचा विचार करू नका, पण हे लक्षात ठेवा काँग्रेस पक्षात आलेल्यांना काँग्रेस पक्षच दोन तासात मंत्री करतो हे दुसर्‍या पक्षाच्या उंबरठ्यावर असलेल्यांनी लक्षात ठेवावे, असे राणेंचे नाव न  घेता टिकास्त्र सोडले.

सिंधुदुर्गात तीन पैकी दोन मतदार संघ आपल्या वाट्याला येणार आहेत.  प्रत्येकाने प्रामाणिक काम करावे. एबी फॉर्म आपणच देणार असल्याचे त्यांनी सांगितले.  नविनचंद्र बांदिवडेकर म्हणाले की, सिंधुदुर्गातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भावना आज मेळाव्याच्या निमित्ताने निदर्शनास आल्या.  या भावना प्रदेश पातळीवर नेऊन निदान सिंधुदुर्गात एक तरी काँग्रेसचं जिल्हाभवन होण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे सांगितले. पुष्पसेन सावंत यांनी काँग्रेस पक्षाने वेळीच उमेदवारी जाहीर करावी, असे आवाहन करत नारायण राणे यांनी काँग्रेस संपवल्याची टिका केली.

यावेळी साईनाथ चव्हाण, अ‍ॅड. दिलिप नार्वेकर, राजु मसुरकर, बाळा गावडे, दादा परब यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे निवेदन व आभार विजय प्रभू यांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या