….तर आठ दिवसात खासदारकीचा राजीनामा देईन- आझम खान

सामना ऑनलाईन । रामपूर

लोकसभा निवडणुकीत रामपूर मतदारसंघ चर्चेचा विषय ठरला होता. या मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे आझम खान विजयी झाले आहेत. या मतदारसंघात आझम खान यांनी जयाप्रदा यांच्यावर टीका करताना मर्यादा सोडल्यामुळे ते चर्चेत आले होते. तसेच त्यानंतरही त्यांनी अनेकदा वादग्रस्त विधाने केली होती. या मतदारसंघात धर्माचा मुद्दाही चर्चेत होता. आता निवडून आल्यावरही आझम खान यांनी वादग्रस्त विधान केले आहे. आपल्याला मतदारसंघातील सर्व धर्मियांची मते मिळाली नसतील तर आपण आठ दिवसात राजीनामा देऊ, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

रामपूर मतदारसंघात आझम खान यांनी जयाप्रदा यांचा एक लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला आहे. आपल्याला मतदारसंघातील प्रत्येक वर्गाचे आणि प्रत्येक जातीचे मत मिळाले आहे, असा दावाही खान यांनी केला आहे. ज्या मतदान केंद्रात आपल्याला मताधिक्य मिळाले आहे, त्या मतदान केंद्रातून याची खातरजमा होऊ शकते, असे ते म्हणाले. आपल्याला सर्व जातींचे मते मिळाली नसतील, तर आठ दिवसात लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देईन, असे खान म्हणाले. उत्तर प्रदेशात महाआघाडीला अपेक्षित विजय मिळाला नाही, हा गंभीर चर्चेचा विषय आहे. याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. पक्षातील ज्येष्ठ नेते याबाबत गांभीर्याने चर्चा करतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

या निवडणुकीत प्रचारादरम्यान आपल्यावर अन्याय झाला आहे, असा आरोपही खान यांनी केला. आपल्यावर अन्याय झाला नसता, तर आपले मताधिक्य तीन लाखांपेक्षा जास्त असते, असा दावाही त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दुसऱ्यांदा विजय झाला आहे. जनतेने दिलेला हा आश्चर्यकारक कौल आहे. मोदी आता द्वेषाचे धोरण राबवणार नाहीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. देशातील एका वर्गात उदासी आणि नैराश्य आहे, ते दूर करण्याचा मोदी यांनी प्रयत्न करावा, असेही खान म्हणाले.