‘मासिक पाळीच्या काळात स्वयंपाक करणारी महिला पुढच्या जन्मी होईल कुत्री’ – स्वामी कृष्णस्वरुप दास

579

मासिक पाळीच्या काळात स्वयंपाक करणाऱ्या स्त्रीला पुढचा जन्म कुत्रीचा मिळेल, असे वादग्रस्त वक्तव्य भुज येथील स्वामी नारायण मंदिराचे पुजारी स्वामी कृष्णस्वरुप दासजी यांनी केलं आहे. एवढ्यावरच स्वामी थांबले नाहीत, तर मासिक पाळीच्या काळात स्त्रीने केलेला स्वयंपाक जो पुरुष खातो त्याला पुढचा जन्म बैलाचा येईल अशीही मुक्ताफळे त्यांनी उधळली. स्वामी कृष्णस्वरूप यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हं आहेत. ‘अहमदाबाद मिरर’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

नेमकं काय म्हणाले कृष्णस्वरुप दासजी ?

“ज्या स्त्रीला मासिक पाळी आली आहे, तिने स्वयंपाक केला तर तिला पुढचा जन्म कुत्रीचा येईल. तिने केलेलं जेवण जो पुरुष जेवेल त्याला पुढचा जन्म बैलाचा येईल. अशा महिलांच्या हातचं तुम्ही खात असाल तर त्या गोष्टीला तुम्हीच जबाबदार आहात. शास्त्रात याबाबत अगदी स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. लग्न होण्याच्या आधीपासून तुम्हाला या गोष्टी माहित असल्या पाहिजेत. मी याआधी तुम्हाला अशा प्रकारचा कोणताही सल्ला दिलेला नाही. आपल्या धर्मातल्या काही गोष्टींबाबत बोलू नका असे मला काही संत सांगत असतात. मात्र मी याबद्दलच बोललो नाही तर लोकांना समजणार कसे?” असेही स्वामी कृष्णस्वरुप यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या