अशोक गेहलोत यांना काँग्रेसचे अध्यक्षपद मिळणार?…तर्कवितर्क सुरू…

ashok-gehlot

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत मंत्रिमंडळ विस्तार करण्याच्या विचारात आहेत. तर दुसरीकडे गेहलोत यांना दिल्लीला बोलावून त्यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी अद्याप होकार दिलेला नाही. राहुल यांनी अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी नकार दिल्यास या पदासाठी गेहलोत यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. गेहलोत काँग्रेसचे निष्ठावंत असून गांधी परिवाराचे विश्वासू आहेत. त्यामुळे हे पद त्यांच्याकडे देण्यात येण्याची शक्यता आहे.

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पक्षाच्या स्थायी अध्यक्षांबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे. राहुल गांधी यांनी पुन्हा काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारावे, यासाठी त्यांचे समर्थक त्यांची मनधरणी करत आहेत. मात्र, अध्यक्षपद स्वीकारण्याबाबत राहुल गांधी यांनी अद्याप होकार दिलेला नाही. राहुल गांधी परदेशातून परतल्यावर त्यांचे समर्थक त्यांना अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी गळ घालणार आहेत.

राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी तयार झाले नाहीत, तर स्थायी अध्यक्षपद कोणाला द्यायचे, याबाबत पक्षामध्ये विचारमंथन सुरू आहे. सद्यपरिस्थितीत सोनिया गांधी यांनीच स्थायी अध्यक्षपद स्वीकारावे किंवा या पदासाठी योग्य व्यक्तींची निवड करावी, अशी मागणी होत आहे. या सर्व राजकीय घडामोडींमोडी अशोक गेहलोत यांच्याकडे पक्षाचे अध्यक्षपद देण्यात यावे, असे काही नेत्यांचे मत आहे. गेहलोत निष्ठावंत, विश्वासू असून सर्वांना सोबत घेत वाटचाल करणारे आहेत, त्यामुळे त्यांना पक्षाचे अध्यक्षपद द्यावे, अशी मागणी होत आहे.

अशोक गेहलोत यांच्याकडे पक्षाचे अध्यक्षपद देण्याच्या चर्चा याआधीही झाल्या होत्या. मात्र, गेहलोत राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार नव्हते. त्यामुळे याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला होता. आता पुन्हा गेहलोत यांच्या नावाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, गेहलोत मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार नसल्यास अध्यक्षपद कोणाला द्यावे, असा प्रश्न काँग्रेससमोर उभा ठाकला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या