गुजरातमध्ये भाजप जिंकली तर पुन्हा जीएसटी वाढवतील!; उद्धव ठाकरे यांचा टोला

49

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

गुजरात निवडणुकीत भाजपाची पोझिशन टाइट असून खुद्द पंतप्रधान तिथे ५० सभा घेत आहेत. तिथे भाजपा हरली तर मोदी सरकारला देशात थारा नाही आणि जिंकली तर उद्या जीएसटी पुन्हा वाढवतील, असा सणसणीत टोला आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला. स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते.

गुजरातमधील व्यापारीवर्ग संतापल्यानेच केंद्र सरकारने जीएसटी कमी केल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. ‘होय, मी लाभार्थी आहे’ अशा कोट्य़वधींच्या जाहिराती करणाऱ्या राज्य सरकारवरही त्यांनी टीकास्त्र सोडले. जनतेच्या पैशाने अशा जाहिराती करून स्वत:चे चेहरे दाखवणाऱ्या सरकारला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
राजापुरातील जवाहर चौक येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्य़ाचे अनावरणही उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. सिद्दी जौहरला मदत करणाऱ्या इंग्रजांना धडा शिकवण्यासाठी शिवाजी महाराजांनी इंग्रजांची राजापुरातील वखार उद्ध्वस्त केली होती. त्यातून धडा घेत आपण स्वराज्यावर चाल करून येणाऱ्यांचा खात्मा केला पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ज्यांना मोठे केले तेच अंगावर येऊ लागल्याने त्यांना धडा शिकवलाच पाहिजे, असे ते म्हणाले.

याप्रसंगी शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री रवींद्र वायकर, उपनेत्या मीनाताई कांबळी, जिल्हा संपर्कप्रमुख विजय कदम, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, आमदार राजन साळवी, उदय सामंत, सदानंद चव्हाण, वैभव नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कोकणातील पहिला स्कायवॉक तसेच खासदार विनायक राऊत यांच्या कार्यालयाचे उद्घाटनही यावेळी झाले.
राजापुरातील ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला जनतेचा विरोध आहे. त्यामुळे शिवसेनेचाही या प्रकल्पाला विरोधच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात करतात. मग ते जनतेची मन की बात का ऐकत नाहीत? असा प्रश्न उपस्थित करताना आम्ही सत्तेत असलो तरी जनतेला हवं तेच करणार, असे स्पष्टपणे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

हार्दिक पटेल यांच्याबाबत ते म्हणाले की, निवडणुकीच्या वेळेस असे विषय बाहेर कसे येतात? तुम्ही आधीच का नाही त्याच्यावर कारवाई केलीत? गुजरातमधील राजकारण आता खालच्या पातळीवर चालले असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

जनतेला रिफायनरी नको असेल तर शिवसेनेचाही विरोध
रत्नागिरीतील रिफायनरी प्रकल्पांना जनतेचा विरोध आहे. शिवसेना जनतेसोबत असून जनतेला रिफायनरी नको असेल तर शिवसेनाही त्याला विरोध करेल, असे याप्रसंगी उद्धव ठाकरे यांनी सांगितले. शिवसेनेने प्रयत्न केल्यामुळेच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली. कोकणासह सर्वच शेतकऱ्यांना ती मिळायला हवी; पण मिळाली नाही. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे योजना जाहीर करून त्यांचे नाव बदनाम करू नका, असा सल्लाही उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिला.

नोटाबंदीमुळे वेश्याव्यवसाय घटला; रविशंकर यांचा नवा शोध
सरकारने नोटाबंदी केली तेव्हा काय घोषणा केल्या होत्या… दहशतवाद कमी होईल, काळा पैसा बाहेर येईल, खोट्य़ा नोटांना आळा बसेल. पण काय झालं? आता तर रविशंकर यांनी नवा शोध लावलाय की, नोटाबंदीमुळे वेश्याव्यवसाय कमी झाला. हे त्यांना कसं कळलं, असा मार्मिक टोलाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी हाणला.

एक दगड राष्ट्रवादीचा आहे काय?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवसेना सत्तेत राहून दोन दगडावर पाय ठेवत आहे असा आरोप केला होता. त्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज उत्तर दिले. ते म्हणाले की, शिवसेना सत्तेत राहून दोन दगडांवर पाय ठेवत आहे. त्यातील एक दगड राष्ट्रवादीचा आहे का? कारण नाना पटोले सांगतात की, हे सरकार शिवसेनेच्या पाठिंब्यावर चाललेले नाही. मग ते कोणाच्या पाठिंब्यावर चाललेले आहे याचे उत्तर त्यांनी द्यावे.

आपली प्रतिक्रिया द्या