मातापित्यांचे संगोपन केले नाही तर शिक्षकांच्या पगाराला लावणार कात्री

56

सामना ऑनलाईन । नगर

जन्मदात्या मातापित्यांचा सांभाळ न करणाऱ्या शिक्षकांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून त्यात कोणी दोषी आढळल्यास शिक्षकांच्या पगारातील ३० टक्के रक्कम आईवडिलांच्या खात्यात जमा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा परिषदच्या शिक्षण विभाग समितीने घेतला आहे. असा निर्णय घेणारी राज्यातील ही बहुधा पहिलीच जिल्हा परिषद असणार आहे.

नुकतीच शिक्षण समितीचे सभापती राजश्री घुले यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला राजेश परजणे, जालिंदर वाकचौरे, राहुल झावरे, शिवाजी गाडे, शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे आदी उपस्थित होते.
जन्मदात्या मातापित्यांचा आपल्या मुलाकडून सांभाळा होतो की नाही याबाबत चर्चा करण्यात आली. अनेक ठिकाणी आईवडिलांना मुलाकडेच पैसे मागावे लागतात आणि मुलगा पैसे देण्यास अथवा आईवडिलांचा सांभाळ करण्यास तयार होत नाही अशासुद्धा बाबी पुढे आल्या आहेत. कधी मातापित्यांना न्यायालयाची पायरीसद्धा चढावी लागते. वयोमानाचा विचार करता त्यांचा सांभाळ करणे अत्यंत महत्त्वाचे असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे आता जिल्हय़ात कार्यरत असलेल्या शिक्षकांचे व त्यांच्या कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला असून यामध्ये जर कोणी दोषी आढळल्यास त्या शिक्षकांच्या पगारातील ३० टक्के रक्कम ही त्यांच्या आईवडिलांच्या खात्यात जमा करण्याचा ठराव या समितीने एकमताने घेतला आहे.

ज्या जिल्हा परिषदच्या शिक्षकांची मुले या शाळांमध्ये शिकत नाहीत त्या शिक्षकांचेसद्धा समुपदेशन करून त्यांची मुले शाळेत दाखल करण्यात येणार आहेत. ज्या शिक्षकांची मुले २०१८-१९ मध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणार नाहीत त्यांना सुविधा ज्या देण्यात येतात त्या काढून घेण्याचाही निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला. दरम्यान, मातापित्यांसंदर्भात काळजी न घेणाऱ्या शिक्षकांवर एकप्रकारे चापच बसणार आहे. जिल्हा परिषदेने घेतलेला हा बहुधा राज्यात पहिलाच निर्णय घेतला गेला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या