दोन पेक्षा अधिक अपत्ये असणाऱ्यांना आणखी एक दणका

सामना ऑनलाईन, मुंबई

दोन पेक्षा अधिक अपत्ये असल्यास गृहनिर्माण संस्थेच्या व्यवस्थापकीय समितीच्या सदस्यत्वाचाही तुम्हाला त्याग करावा लागेल. अन्यथा कोणी तक्रार केल्यास तुमचं पद अपात्र घोषित करण्यात येईल. सहकारी संस्थांच्या सहाय्यक उपनिबंधकांनी एका तक्रारीसंदर्भातील सुनावणीदरम्यान कायद्यातील या तरतुदीची आठवण करून दिली. मुंबई सेंट्रल भागातील एका गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकासासंदर्भातील वाद निवाड्यासाठी सहाय्यक उपनिबंधकांपुढे आला होता. यामध्ये तक्रारदाराने आक्षेप नोंदवला होता की पुनर्विकासाचा निर्णय गृहनिर्माण संस्थेतील काही सदस्यांच्या संमतीशिवाय घेण्यात आला.

न्यू ग्रीन चेंबर्स सहकारी गृहनिर्माण संस्थेमधील रहिवासी हसन अली मुकादम यांनी  गृहनिर्माण संस्थेचे संयुक्त खजिनदार समीर शाह आणि व्यवस्थापकीय समितीचे सदस्य इम्रान खान यांच्याविरोधात ही तक्रार केली होती. या वादासंदर्भात निवाडा करताना सहाय्यक उपनिबंधक कुमार चव्हाण यांनी आदेश दिला की ज्या व्यक्तींविरोधात तक्रार करण्यात आली आहे, त्यांची २ पेक्षा जास्त अपत्ये असल्याने ते गृहनिर्माण संस्थेवर निवडून येऊ शकत नाही,स्वीकृत केले जाऊ शकत नाही किंवा नियुक्त केली जाऊ शकत नाही. त्यामुळे गृहनिर्माण संस्थेतील पदावर अपात्र घोषित करण्यात येत आहे. साहजिकच आहे त्यांना अपात्र घोषित केल्याने समितीने घेतलेल्या निर्णयांवर देखील त्याचा परिणाम होणार आहे.

इम्रान खान यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितलं की त्यांची दोनच अपत्ये आहेत. आणि सहाय्यक उपनिबंधकांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीबाबत त्यांना कोणतीही माहिती नाहीये. न्यूग्रीन सोसायटीचे अध्यक्ष हमीद शेख यांनी सांगितलं की ते सहाय्यक उपनिबंधकांच्या आदेशाला आव्हान देणार आहेत , कारण तक्रारदारांची जर याच मुद्दावर हरकत होती तर ती त्यांनी निवडणुकीच्या वेळी का उपस्थित केली नाही ?

मुकादम यांच्या वकीलांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं की सहाय्यक उपनिबंधकांनी कायद्यानुसारच आदेश दिला आहे आणि या कायद्याबाबत सोसायटीच्या सदस्यांना माहिती नव्हती याने काहीही फरक पडत नाही.

आपली प्रतिक्रिया द्या