गोव्यात टल्ली होऊन पोहाल, तर शिक्षा भोगाल!

27

सामना ऑनलाईन । पणजी

मद्यधुंद अवस्थेत समुद्रात पोहण्याच्या उद्देशाने उतरणाऱ्यांना आळा घालणारा कायदा अमलात आणण्याचा मुद्दा गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यापुढे मांडणार असल्याचे पर्यटन मंत्री मनोहर आजगांवकर यांनी बुधवारी सांगितलं. या महिन्याच्या सुरुवातीला पोहताना बुडून अनेक मृत्यू झाले होते. या मृत्युसंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या संबंधित विभागाच्या बैठकीनंतर जाहीर करण्यात आलेल्या निवेदनात आजगांवकर यांनी सरकारला आवश्यक वटहुकूम काढण्याचा प्रस्ताव देणार असल्याचं सांगितलं. तसंच गरज वाटल्यास यंदाचा पर्यटन हंगाम सुरू होण्याआधीच तो जारी करण्याचाही प्रस्ताव देणार असल्याचं स्पष्ट केलं. ते म्हणाले, की गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर बुडण्यामुळे होणाऱ्या मृत्युंमुळे राज्याचे नाव खराब होत आहे. पर्यटन खात्यासह सर्व संघटनांनी याबाबतीत जबाबदारीने कार्यवाही करण्याची तसेच आवश्यक असल्यास पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी कडक पावलं उचलण्याची गरज असल्याचं सांगितलं.

दुर्दैवाने बुडणे किंवा मारामारी अशा प्रकारच्या घटनांमध्ये मद्यप्राशन केलं असल्याचं बहुतांश वेळेस समोर आलं आहे. त्याचबरोबर रात्री उशिरा पर्यटक खोल समुद्रात जात असल्याचं निदर्शनास आल्याचंही ते म्हणाले. पर्यटक पोलीस दल, किनारपट्टी पोलीस आणि दृष्टी लाइफ सेव्हिंग यांच्या प्रतिनिधींबरोबर झालेल्या बैठकीत आजगांवकर यांनी पर्यटकांना अंधार पडल्यानंतर हॉटेल्समधील पोहण्याच्या तलावात उतरण्यास जशी बंदी असते, तशीच ती समुद्रकिनाऱ्यांनाही लागू व्हावी, याबाबत आपलं मत व्यक्त केलं.

पर्यटन खात्याने समुद्रकिनारपट्टीवरील सर्व शॅक चालकांना त्यांच्या शॅकमध्ये पर्यटकांना मद्यधुंद अवस्थेत समुद्रात उतरण्यास मनाई असल्याचे दर्शवणारे फलक लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. मद्यधुंद अवस्थेत पोहण्याच्या धोक्यांविषयी जागृती करण्याची गरज असल्याचंही यावेळेस सांगण्यात आलं. आजगांवकर यांनी पर्यटक पोलीस दल, किनारपट्टी पोलिस आणि दृष्टी लाइफ सेव्हिंग यांना समुद्रकिनाऱ्यांवरील सुरक्षा आणि समुद्रातील गस्त वाढवण्यासाठी सर्वप्रकारे पाठिंबा देण्याबद्दल जाहीर केलं. तसेच उत्तर व दक्षिण गोव्यातील किनारपट्टीवर रुग्णवाहिकेसारख्या वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यास सहमती दर्शवली. संबंधित संघटनांच्या सर्व प्रतिनिधींची समिती स्थापन करण्यात आली असून समुद्रकिनारे आणि पाण्यातील गस्तीचा आढावा घेण्यासाठी महिन्यातून एकदा त्यांची बैठक घेतली जाणार आहे.

दरम्यान, गुजरातमधील दोन विद्यार्थ्यांचा बुधवारी कांदोळी येथील समुद्रात बुडून मृत्यू झाला. अहमदाबाद-गुजरात येथील मुद्रा इंस्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशनचे ४७ विद्यार्थी अभ्यास दौऱ्यासाठी शिक्षकांसोबत गोव्यात आले होते. त्यातील ६ जणांचा गट मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास कांदोळी समुद्रात पोहण्यासाठी पाण्यात उतरला होता. त्यातील अनुजा सुसान पॉल(चेन्नई) आणि गुर्राम चेंचु साई(आंध्र प्रदेश) ही दोघे पाण्याचा जोरदार लाटेबरोबर पाण्यात ओढले गेले आणि त्यांचा बुडून मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या