१६ गावांना जोडणाऱ्या कांचनगाव खैरगाव रस्त्याची दुरवस्था, शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

59

सामना प्रतिनिधी, इगतपुरी

तालुक्यातील घोटीपासून कांचनगाव- तळोघ-खैरगावमार्गे देवळे अशा जवळपास १६ गावांना जोडणाऱ्या रस्त्याची अक्षरशः दुरवस्था झाली आहे. घोटीजवळील देवळे पुलाला भगदाड पडल्याने वाहतुकीचा ताण या मार्गावरच पडला आहे. त्यामुळे रस्त्याची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. या मार्गावरून वाहन चालविणे जिकीरीचे झाले असून अपघातांच्या संख्येतही वाढ झाली आहे. येत्या आठ दिवसांत रस्त्याची दुरुस्ती करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने बांधकाम विभागाला दिला आहे.

तालुक्यातील घोटीपासून कांचनगाव-तळोघ-शेणवड बुद्रुक-खैरगाव मार्गे देवळे गावाजवळ घोटी सिन्नर महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. वाहनचालकांना या मार्गावरून खड्डे चुकवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील अपघातांच्या संख्येत वाढ झाल्याने रस्त्याची दुरुस्ती करा, अन्यथा रस्ता कायमचा बंद करा अशी संतप्त प्रतिक्रिया या परिसरातून येत आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दाद देत नसल्याने तीव्र आंदोलनांचा पवित्रा घेत आहोत असे निवेदन विठ्ठल लंगडे यांनी तहसीलदार अनिल पुरे यांना दिले आहे. या मार्गावरील वाहतूक घोटी रेल्वे गेट, कांचनगाव, शेणवड बुद्रुक, तळोघ, खैरगाव आदी गावांतून जाणाऱ्या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. देवळे गावाजवळ महामार्गाला जोडणारा या पर्यायी मार्गावरील सर्व रस्त्यांची वाहतुकीमुळे अत्यंत केविलवाणी अवस्था आहे. खड्ड्यांचे साम्राज्य असलेल्या या रस्त्यावरून प्रवास करताना नावेत बसल्याचा अनुभव येत असल्याचे या परिसरातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सध्या खड्ड्यांमुळे रस्ताच राहिला नसून अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

या रस्त्याच्या कामासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात येतो. मात्र अवजड वाहनांच्या क्षमतेचा रस्ता बनवला जात नसल्याने रस्त्यावर खड्डे पडतात. या रस्त्यावरून १६ गावांतील ग्रामस्थ रोज प्रवास करतात. मात्र रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे या रस्त्यावरील प्रवास नकोसा झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या