गड सर करणारी यशवंती अस्तित्व राखण्यात ठरतेय अपयशी! सह्याद्रीच्या पट्ट्यात घोरपडीची होतेय शिकार

429

सामना प्रतिनिधी, संगमेश्वर

स्वराज्यात कोंढाणा किल्ला सर करण्यासाठी तानाजी मालुसरेंना मोलाची मदत करणारी घोरपड ‘यशवंती ’ नावानं ओळखली जाऊ लागली खरी, मात्र कालांतराने याच यशवंतीला वाढत्या शिकारीमुळे स्वतःचे अस्तित्व राखण्यातच अपयश येऊ लागले आहे. घोरपडीची शिकार अशीच सुरू राहिली तर तिचे अस्तित्व संपुष्टात येण्याची भीती निसर्गमित्रच्या अनिकेत बापट यांनी व्यक्त केली आहे.

आपल्या अणुकुचिदार नखांनी मजबूत आणि घट्ट पकड करणारी घोरपड स्वराज्यात कोंढाणा किल्ला सर करताना शूरवीर तानाजी मालुसरेंच्या मदतीला धावली होती. त्यावेळीपासून घोरपडीला खरी ओळख प्राप्त झाली. इतिहासाच्या पुस्तकातही घोरपडीला मानाचं स्थान मिळालं. असं असलं तरी घोरपडीचं मांस चविष्ट आणि औषधी म्हणून ओळखलं जातं. याच गुणांमुळे सध्या घोरपडींची शिकार करण्याचं प्रमाण कमालीचं वाढलं असल्याने भविष्यात तिच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होण्याची भीती सह्याद्रीतील निसर्गमित्रांना वाटू लागली आहे.

मुळातच दुर्मिळ असलेल्या घोरपडींचे अस्तित्व शोधण्यासाठी शिकारी मंडळी सह्याद्रीच्या कडेकपारीत फिरत असतात. परिणामी त्यांची संख्या वेगाने घटू लागली आहे. शिकारीचे हे वाढते प्रमाण असंच सुरू राहिल्यास नजीकच्या काळात या प्रजातीचं अस्तित्व संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झाला आहे. घोरपडीच्या शिकारीवर वनविभागाने कठोर निर्बंध आणण्याची गरज असून बेकायदा शिकार करणाऱ्या मंडळीवर कारवाई करण्यासाठी सह्याद्रीच्या कडेकपारीतील गस्त वाढविण्याची खरी गरज आहे. अन्यवेळी डुकरांची शिकार करणाऱ्या शिकाऱ्यांनी मानवता दाखवून भविष्यात अस्तित्व गमावण्याची वेळ आलेल्या घोरपडीची शिकार होऊ नये यासाठी विचारमंथन करण्याची गरज आहे. याबरोबरच राज्य शासनाच्या वन मंत्रालयानं कोकणातील घोरपडींची शिकार थांबवून त्यांचे संवर्धन होण्यासाठी ठोस उपाय हाती घेण्याची मागणी निसर्गमित्रच्या अनिकेत बापट यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या