जंगलतोड, काँक्रीटीकरणामुळेच केरळ, कर्नाटक बुडाले

सामना ऑनलाईन, मुंबई

केरळ आणि कर्नाटकात उद्भवलेल्या पूरस्थितीला निसर्ग नव्हे तर मानवी चुका कारणीभूत आहेत. वेगाने होणाऱ्या शहरीकरणामुळे वाढलेले सिमेंटचे जंगल आणि शेतजमीन वाढवण्यासाठी झालेली जंगलतोड या दोन कारणांमुळेच ही पूरस्थिती निर्माण झाली असा निष्कर्ष आयआयटी मुंबईच्या शास्त्रज्ञांनी काढला आहे.

आयआयटी मुंबईतील सिव्हिल इंजिनीयरिंग विभागातील शास्त्रज्ञ प्रा. टी. आय. एल्दो आणि त्यांचे सहकारी राकेशकुमार सिन्हा यांनी अद्ययावत संगणक प्रणालीचा वापर करून केरळ आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये जमिनीच्या वापरात झालेल्या बदलाचा अभ्यास केला. काँक्रीटीकरण आणि जंगलतोडीमुळे दक्षिण कर्नाटकच्या नेत्रावती खोऱ्यात सतत पूर येतो अशा निष्कर्षाप्रत ते पोहोचले. नेत्रावतीबरोबरच अन्य खोऱ्यांचाही त्यांनी अभ्यास केला.

कोणतेही पूर्वनियोजन न करता केरळमधील पेरीयार नदी तसेच दक्षिण कर्नाटकातील नेत्रावती नदीच्या किनाऱ्यावर बांधकामे केली गेली आहेत. त्यामुळे नद्यांच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला असून त्यामुळे भविष्यात पूरस्थिती ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत प्रा. एल्दो आणि सिन्हा यांनी चालू वर्षाच्या सुरुवातीलाच मांडले होते.

शास्त्रज्ञांनी 1972 पासून या भागांमध्ये झालेल्या बदलांचा पाच टप्प्यांत अभ्यास केल्यानंतर हे मत मांडले होते. नद्यांकिनारी झालेल्या सिमेंटच्या बांधकामांमुळे पाण्याला जमिनीत मुरण्यास वावच उरलेला नाही. इतकेच नव्हे तर जमिनीखालची पाण्याची पातळीही कमी होऊन त्याचा परिणाम कृषी उत्पादनांवर झाला आहे. इतकेच नव्हे तर पाण्याची कमतरता निर्माण झाली.

घरे राहण्यासारखी नाहीत; साप, विंचवांचाही धोका

महापुराचे पाणी भले ओसरत आले असले तरी घरांची अवस्था राहायला जाण्यासारखी नाही. अनेक घरांची पडझड झाली आहे. पुनर्वसनाच्या कामाचेच मोठे आव्हान आहे. पाणी घुसल्यामुळे घरात साप, विंचवांचाही धोका आहे. त्यामुळे पूर्ण खबरदारी घेऊनच लोकांना घरी परत पाठवले जाणार आहे.

 केरळ शास्त्र साहित्य परिषदेच्या आकडेवारीनुसार केरळमध्ये 75 लाख कुटुंबे आणि 85 लाख घरे आहेत. दरवर्षी त्यात 2 लाख 70 हजार घरांची भर पडते. दुसरीकडे ओलिताखालची जमीन कमी होत आहे. 1980 मध्ये 8.5 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली होती. आता फक्त 1.9 लाख हेक्टर उरली आहे.

 यंदा केरळमध्ये झालेला पाऊस हा 50-100 वर्षांत एकदाच होतो. पण पाणी आणि नद्यांच्या खोऱ्याचे नीट व्यवस्थापन केले तर अशा पावसामुळे होणारे बहुतांश नुकसान टाळता येऊ शकते असा सल्ला प्रा. एल्दो यांनी दिला आहे.

 कर्नाटकातील नेत्रावतीच्या खोऱ्यात सुमारे 12 लाख लोक राहतात आणि ही संख्या पुढील 12 वर्षांत दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. 1972 मध्ये तिथे 60 चौरस किलोमीटर क्षेत्रात शहरीकरण झाले होते. 2012 मध्ये ते क्षेत्र 240 चौरस किलोमीटरपर्यंत विस्तारले. 2030 पर्यंत ते 340 चौरस किलोमीटरवर जाण्याची शक्यता आहे. नेत्रावती पश्चिम घाटात उगम पावते. तिचे पाणी मंगळूर आणि बंटवालमधील लोक पिण्यासाठी वापरतात.