‘आयआयटी’ मुंबईने बनवली उपग्रहांना ऊर्जा पुरवणारी पहिली स्वदेशी चिप

सामना प्रतिनिधी, मुंबई

उपग्रहांना ऊर्जा पुरवणारी स्वदेशी बनावटीची चिप पवई येथील आयआयटी मुंबईच्या शास्त्रज्ञांनी बनवली आहे. या चिपला ‘अजित’ असे नाव देण्यात आले आहे. ही चिप म्हणजे एक प्रोसेसर आहे. रोबो आणि ऑटोमेशन सिस्टम्समध्येही या चिपचा वापर केला जाऊ शकणार आहे.

‘अजित’ची संकल्पना आयआयटी मुंबईत बनली. त्यानंतर त्याचे डिझाईन तिथेच बनवले गेले आणि आता चिपची निर्मितीही तिथेच झाली. म्हणजेच ही पूर्णपणे स्वदेशी बनावटीची पहिली चिप आहे. यापूर्वीही हिंदुस्थानात ‘शक्ती’ ही चिप आयआयटी मद्रासमधील शास्त्रज्ञांनी बनवली होती परंतु ती बनवण्यासाठी ब्लूस्पेक या कंपनीचे सहकार्य घेण्यात आले होते.

‘अजित’ ही पूर्णपणे आयआयटी मुंबईतच बनवली गेली आहे. शक्ती चिपचा वापर मोबाईल आणि संगणकांमध्ये केला जाऊ शकतो तर अजितचा वापर उपग्रह आणि रोबोसारख्या मोठय़ा यंत्रणांमध्येही केला जाऊ शकतो. हिंदुस्थानातील नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टममध्ये अजित चिपचा प्रयोग करण्याचा शास्त्रज्ञांचा मानस आहे.