आमच्यावर कोणीच भरवसा ठेवत नाही, पाकिस्तानी मंत्र्याने बोलून दाखवले दु:ख

कश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पाकड्यांनी थयथयाट केला. विविध देशांसमोर जाऊन त्यांनी रडगाणे गाऊन दाखवले.  ‘मात्र आता कोणताच देश आमच्यावर भरवसा ठेवत नाही. सगळे देश हिंदुस्थानच्या पाठीशी उभे असून त्यांचेच ऐकले जाते’ असं पाकिस्तानचे गृहमंत्री इजाज अहमद शाह यांनी म्हटले आहे.  शाह यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले की जगभरात पाकिस्तानची छबी बेजबाबदार राष्ट्र अशी झाली आहे आणि त्यामुळे कश्मीरप्रश्नी आमच्यावर आता कोणीच भरोसा ठेवत नाही.

शाह यांनी पाकिस्तानात दहशतवाद्यांचे अड्डे असल्याचं मान्य करत असतानाच आम्ही त्यांच्याविरूद्ध कारवाई केल्याचाही दावा केला आहे. पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांनी या अफगाणिस्तानमध्ये युद्धात घेतल्याचं आणि कश्मीरमध्ये अशांतता पसरवण्याचं सातत्याने काम केलं याचीही कबुली शाह यांनी दिली आहे. गेल्या महिन्यात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानात 30-40 हजार दहशतवादी असल्याचं म्हटलं होतं. हे सगळं कबूल करणाऱ्या इम्रान खान सरकारला जैश-ए-मोहम्मदवर काय कारवाई करण्यात आली असा प्रश्न विचारला असता याबाबतचे उत्तर देण्यास त्यांच्याकडून टाळाटाळ करण्यात येत आहे.

सगळं जग आता हिंदुस्थानवर का भरोसा करतं हे सांगताना पाकिस्तानचे गृहमंत्री इजाज अहमद शाह म्हणाले की आंतरराष्ट्रीय पातळीवर ही परिस्थिती एका दिवसात तयार होत नाही. कोणत्याही देशाप्रती जागतिक पातळीवर भरवसा निर्माण व्हायला अनेक वर्ष लागतात. पाकिस्तानला आता कोणीच गांभीर्याने घेत नसून यासाठी पाकिस्तानमध्ये यापूर्वी जे शासनकर्ते होते तेच जबाबदार असल्याचं शाह म्हणाले आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या