अनैतिक संबंधातून भाच्याने केली आत्याची हत्या, नागोठण्यातील प्रकार

अनैतिक संबंधातून वारंवार करीत असलेल्या पैशांच्या मागणीमुळे भाच्याने आत्याची डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना नागोठणे येथील करकरणी मंदिर परिसरात घडली. पुरावा नष्ट करण्यासाठी या भाच्याने आत्याच्या मृतदेहावर पेट्रोल ओतून जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. दीपाली शिद असे मृत महिलेचे नाव आहे. तर विजय शिद असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी आरोपी विजय याला अटक केली आहे.

आरोपी विजय आणि मृत दीपाली हिचे अनैतिक संबंध होते. दीपाली ही विजयकडून वारंवार पैशांची मागणी करीत असे. तसेच पैसे न दिल्यास त्याला मारहाण करायची. त्यामुळे विजय याने ३ एप्रिल रोजी तिला करकरणी मातेच्या मंदिर परिसरातील डोंगराळ भागात नेले होते. याठिकाणी दोघांच्यात भांडण झाले. त्यातून विजयने दीपालीची दगडाने ठेचून हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी खबऱ्यांच्या मदतीने आरोपी विजयला अटक केली. या भागातील सुरक्षारक्षकामुळे या गुन्ह्याचा छडा लागला. अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, पोलीस उपविभागीय अधिकारी पी. आर. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलीस निरीक्षक तानाजी नारनवार, रोहा पोलीस निरीक्षक पाटील, वडखळ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या टीमने आरोपीला अटक केली.