नामांकित कंपनीची बाटलीत हलक्या दर्जाची दारू, धारावीतला कारखाना उद्ध्वस्त केला

नामांकित कंपनीच्या बाटलीत हलक्या प्रतीची दारू भरून ती विकणाऱ्या टोळीला पोलिसांनी पकडलं आहे. ही हलक्या प्रतीची दारू नामांकित कंपन्यांची दारू असल्याचं सांगत विकली जात होती. धारावीमध्ये हा सगळा प्रकार सुरू असल्याचे कळाल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या शिवडी शाखेने हा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईमध्ये साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

धारावीच्या शास्त्रीनगर परिसरात असलेल्या एक मजली घरात बनावट दारू बनविण्याचा कारखाना थाटण्यात आला होता. याबाबतची माहिती मिळताच उत्पादन शुल्क विभागाच्या शिवडी शाखेला मिळताच वरिष्ठ निरीक्षक प्रकाश काळे यांच्या नेतृत्वाखाली विनोद अहिरे, प्रविण झाडे,गिरी, पवार या पथकाने सोमवारी या कारखान्यावर छापा टाकला. छापेमारीदरम्यान एक आरोपी नामांकित दारूच्या बाटल्यांमध्ये हलक्या प्रतीची दारू भरत असताना दिसून आला होता. भिका वाघेला (30) याला या प्रकरणी अटक करण्यात आली असून उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी ब्लॅक लेबल, जॉनी वाँकर, गोल्ड रिझर्व्ह यासारख्या बड्या दारू कपन्यांच्या रिकाम्या बाटल्या, बनावट बुचे, लेबल आणि हलक्या प्रतीची दारू सापडली आहे. भिका वाघेलाचे या बनावट दारू प्रकरणातील सहकारी कोण आहेत याचा शोध घेण्याचं काम सध्या सुरू आहे.