मुंबई विद्यापीठाचे वसतिगृह बनलेय दारूचा अड्डा! गैरप्रकार रोखण्याची युवासेनेची मागणी

28

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील कर्मवीर भाऊराव पाटील वसतिगृह हे दारूचा अड्डा बनले आहे. तेथील कर्मचाऱयांकडूनच वसतिगृहाचा गैरवापर सुरू असून अतिशय दयनीय स्थिती झालेल्या या वसतिगृहाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी आणि तेथील गैरप्रकारांना आळा घालावा, अशी मागणी युवासेनेने केली आहे.

कर्मवीर भाऊराव पाटील वसतिगृह हे मुलांसाठी आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वसतिगृहाची अत्यंत गरज असताना दुरुस्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना वसतिगृहापासून वंचित ठेवले गेले आहे. दुरुस्तीचे कामही गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी याची गंभीर दखल घेतली. त्यांच्या सूचनेवरून युवासेना सिनेट सदस्यांनी या वसतिगृहाची पाहणी केली.

युवासेना सिनेट सदस्यांनी कुलसचिव सुनील भिरूड यांची भेट घेऊन त्यांच्याकडे यासंदर्भात निवेदन दिले. वसतिगृहातील गैरप्रकार त्वरित थांबवण्यात यावेत, संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करून विद्यार्थ्यांना वसतिगृह राहण्यासाठी उपलब्ध करून द्यावे, अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
याप्रसंगी युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, शशिकांत झोरे, शीतल शेठ-देवरुखकर, ऍड. वैभव थोरात, निखिल जाधव, मिलिंद साटम, धनराज कोहचाडे, युवासेना सदस्य कैलास पारकर आदी उपस्थित होते. वसतिगृहाच्या दुरुस्तीचे काम लवकरच पूर्ण करू, असे आश्वासन या वेळी कुलसचिवांनी दिले, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद आहे.

आपली प्रतिक्रिया द्या