पेणमधील बेकायदा दगडखाण अखेर बंद

18

सामना प्रतिनिधी । अलिबाग

उत्खनन परवान्याच्या नावाखाली डोंगरच्या डोंगर पोखरणारी पेणच्या मुंगोशी येथील दगडखाण अखेर बंद केली आहे. गावकऱ्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून उपोषणाचे हत्यार उपसून जबरदस्त आंदोलन केल्याने ताळ्यावर आलेल्या प्रशासनाने या दगडखाणीचा परवानाच रद्द केला आहे. त्यामुळे बेकायदा उत्खनन करणाऱ्या खाणमालकांना दणका बसला आहे.

मुंगोशी परिसरात मोठय़ा प्रमाणाकर बेकायदा माती, खडी यांचे उत्खनन सुरू होते. परवाना असला तरी नियमांचे उल्लंघन करून डोंगर भुईसपाट केले जात होते. येथील बेकायदा माती उत्खनन थांबवावे तसेच परवाना रद्द करावा अशी ग्रामस्थांची मागणी होती. यासाठी सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांच्या नेतृत्वाखाली गेले अनेक महिने ग्रामस्थ संघर्ष करत होते. नदी बचाव आंदोलन केल्यानंतर पेण तहसील कार्यालयासमोर उपोषण केले. तिथे प्रशासनाने दखल न घेतल्याने बेकावडे यांनी अखेर अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली होती. या दरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने प्रशासनाने दखल घेत मुंगोशी दगडखाणीचा परवानाच रद्द केल्याची घोषणा केली. त्यामुळे ग्रामस्थांनी काल आपले आंदोलन मागे घेतले.

धनशक्तीविरोधात जनशक्तीचा विजय
पेणचे तहसीलदार अजय पाटणे, अलिबागचे तहसीलदार प्रकाश संकपाळ यांनी बेकावडे यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान गौणखनिज उत्खननाचा परवाना रद्द करत असल्याचे पत्र बेकावडे यांना सुपूर्द करण्यात आले. हा धनशक्ती विरोधातील जनशक्तीचा विजय असल्याची प्रतिक्रिया बेकावडे यांनी दिली आहे .

आपली प्रतिक्रिया द्या