खारमधील बेकायदा कबूतरखाना बंद- पालिकेची कारवाई

233

खार पश्चिम येथील बेकायदा कबूतरखाना मंगळवारी पालिकेने बंद केला. ट्रफिक आयलॅण्ड म्हणून या जंक्शनचा विकास-सौंदर्यीकरण होणे आवश्यक असताना या ठिकाणी कबूतरांना बेकायदेशीरपणे दाणे टाकले जात होते. याबाबत पालिकेकडे अनेक तक्रारीही दाखल करण्यात आल्या होत्या.

खार पश्चिम येथील चौथा रस्ता येथील हे जंक्शन ट्रफिक आयलॅण्ड म्हणून आरक्षित आहे. मात्र या ठिकाणी जीवदया चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून कबूतरखाना सुरू करण्यात आला होता. त्यामुळे या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात कबुतरे जमा होत असल्याने अनेक वेळा अपघात घडण्याची भीती निर्माण होत होती. शिवाय कबुतरांपासून आजार पसरण्याचा धोकाही असल्यामुळे स्थानिक रहिवासी आणि प्रवासी-वाहतूकदारांकडून हा कबुतरखाना बंद करण्यासाठी पालिकेकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पालिकेने कबुतरखाना चालवणाऱया जीवदया चॅरिटेबल ट्रस्टला 2018 साली नोटीसही बजावली होती, मात्र यावर अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे आज संबंधित बेकायदा कबुतरखाना बंद करण्यात आल्याची माहिती पालिका सहायक आयुक्त विनायक विसपुते यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या