डॉक्टर असूनही औषधाचा प्रचार कसा करता? केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना ‘आयएमए’चा सवाल

योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीने बनवलेल्या ‘कोरोनिल’ औषधाची जाहिरात केल्याबद्दल केंद्रीय मंत्री आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यावर इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) आक्षेप नोंदवला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री हे स्वतः एक डॉक्टर असतानाही औषधाचा प्रचार कसे करतात? असा सवाल आयएमएने केला आहे. डॉक्टरने तसे करणे मेडिकलच्या नियमाविरुध्द आहे असे आयएमएचे म्हणणे आहे.

पतंजलीने ‘कोरोनिल टॅब्लेट’ नावाने आयुर्वेदिक औषध बाजारात आणले आहे. 19 फेब्रुवारीला केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत बाबा रामदेव यांनी ते औषध लॉन्च केले होते. कोरोनिल टॅब्लेटला जागतिक आरोग्य संघटना (डब्लूएचओ) आणि केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने मंजुरी दिल्याचा दावा बाबा रामदेव यांनी केला होता. परंतु डब्लूएचओने एका अधिकृत ट्विटमध्ये तो दावा फेटाळला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री चुकीच्या पध्दतीने आणि कोणत्याही शास्त्रीय आधाराविना बनवण्यात आलेल्या औषधाला प्रोत्साहन देऊ शकत नाही असे आयएमएने म्हटले आहे. कोरोनिल औषध हे कोरोनावर प्रभावी आहे तर सरकार लसीकरणासाठी 35 हजार कोटी रुपये का खर्च करत आहे, असाही आयएमएचा सवाल आहे.

आपली प्रतिक्रिया द्या