कॉर्पोरेट करात कपात करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे IMF कडून कौतुक

635

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने  (आयएमएफ) केंद्र सरकारने कॉर्पोरेट करात कपात करण्याच्या निर्णयाचे कौतुक केले आहे. या निर्णयामुळे देशातील गुंतवणूक वाढण्यास मदत होणार असल्याचे आयएमएफने म्हटले आहे. या निर्णयामुळे कॉर्पोरेट क्षेत्राला नवी उभारी मिळेल आणि त्यामुळे गुंतवणुकीच्या प्रक्रियेत तेजी येईल, असेही आयएमएफने म्हटले आहे. हिंदुस्थानला दीर्घ कालावधीसाठी आर्थिक स्थिरतेसाठी महत्त्वाची पावले उचलण्याची गरज असल्याचेही मत आयएमएफने व्यक्त केले आहे. नॉन बँकिंग आर्थिक क्षेत्रातील समस्या सोडवण्याकडेही सरकारने प्राधान्याने लक्ष द्यावे, असे मत आशिया आणि पॅसिफिक विभागाचे आयएमएफचे उपसंचालक एन्ने मैरी गुल्डे वॉफ यांनी म्हटले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना सरकारने निधी उपलब्ध करून दिल्याने बँकिंग क्षेत्रात सुधारणा होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

आयएमएफने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात हिंदुस्थानच्या जीडीपी वाढीच्या अंदाजात कपात केली होती. हा दर 6.1 टक्के राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर 2020 मध्ये यात सुधारणा होऊन तो 7 टक्क्यांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट असल्याने त्याचा परिणाम हिंदुस्थानवरही होत आहे. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. तसेच कॉर्पोरेट करात कपात करण्याच्या निर्णयामुळेही या क्षेत्राला उभारी मिळणार आहे. मात्र, सरकारला या करातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर 1.45 लोख कोटींचा बोजा पडणार आहे. उत्पादन वाढीसाठी सरकारकडून स्टार्ट अप योजनांनाही चालना देण्यात येत आहे. त्यामुळे या निर्णयांचा हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होणार असून गुतंवणूक वाढेल आणि अर्थव्यवस्थेला तेजी येईल, असे आयएमएफने म्हटले आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या