पत्नीशी अनैतिक संबंध : पतीने काढला काटा

300

सामना प्रतिनिधी । पाचोड

पत्नीसोबत अनैतिक संबंध असलेल्या अठ्ठावीस वर्षीय तरुणाचे अपहरण करून, त्याला अनेक दिवस डांबून ठेवून नंतर त्याचा खून केल्याची आणि त्याच्या मृतदेहाचे तुकडे बोअरवेलमध्ये टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना तब्बल पाच महिन्यानंतर उघडकीस आली. २८ मार्च रोजी पोकलँडच्या मदतीने बोअरवेल खोदून काढत पाचोड पोलिसांना तरुणाच्या मृतदेहाचे तुकडे बाहेर काढण्यात यश आले. ही घटना पैठण तालुक्यातील खादगाव येथे घडली. या प्रकरणातील आरोपी असलेले तिघे तरुण गेल्या पाच महिन्यांपासून अपहरणाच्या गुन्ह्यात हर्सूल कारागृहात आहेत.

खादगाव येथील तरुण शेख मुजीम शेख नबी (२८) हा भगवान तानडे यांच्यासोबत नगर येथे ट्रकवर क्लीनर म्हणून कामाला होता. त्याचे गावातील गुड्डू ऊर्फ साहील अफसर शेख याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. नातेवाईकाचा दशक्रियाविधी असल्याने मुजीम हा १० ऑक्टोबर २०१७ रोजी ट्रक घेऊन गावाकडे आला. सायंकाळी साडेसात वाजता जेवण करून घराबाहेर गेला तो परत आलाच नाही. त्याच्या वडील व कुटुंबीयांनी मुजीमचा नातेवाईकासह सर्वत्र शोध घेतला, मात्र तो न सापडल्याने १२ ऑक्टोबर २०१७ रोजी मुजीम बेपत्ता झाल्याची तक्रार पाचोड पोलीस ठाण्यात देण्यात आली.

मोबाईल बंद, हॅन्डसेटही बदलला
पाचोड पोलिसांनी यासंबंधी तपासाची चक्रे फिरवली. सर्व पोलीस ठाण्यांना माहिती व वर्णन कळवले. तर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेश आंधळे व पोलीस उपनिरीक्षक गोरक्ष खरड यांनी मुजीमच्या मोबाईल संभाषणाचा तपशील हस्तगत केला. त्यावेळी गुड्डू ऊर्फ साहील अफसर शेख याच्याशी त्याचे मोबाईलवरून शेवटचे संभाषण झाल्याचे आढळून आले. दरम्यान, गुड्डूने आपला मोबाईल दहा दिवस बंद ठेवला आणि हँडसेटही बदलून टाकला होता. त्यामुळे मुजीमच्या बेपत्ता होण्यामागे गुड्डू व त्याच्या भावाचाच संबंध असल्याची पोलिसांची शंका बळावली.

पित्याची अपहरणाची तक्रार
बुधवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी बेपत्ता मुजीमचे वडील शेख नबी शब्बीर यांनी गुड्डू ऊर्फ साहील शेख, त्याचा भाऊ भोऱ्या ऊर्फ बाबा शेख, कालू ऊर्फ अकबर शेख यांनी अनैतिक संबंधाच्या कारणावरुन आपल्या मुलाचे अपहरण करून त्यास डांबून ठेवलेले असल्याची तक्रार दिली. या तक्रारीवरून पाचोड पोलिसांनी उपरोक्त तिघांविरुद्ध अपहरण करणे, डांबून ठेवणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल केले व त्यांना १६ ऑक्टोबर रोजी अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना जामीन नाकारत हर्सूल कारागृहात पाठविले. तेव्हापासून हे तिघे भाऊ कारागृहातच आहेत.

खुनाला फुटली वाचा
मुजीमचे अपहरण करणारे कारागृहात बंद असल्याने गावात या घटनेमागील सत्य हळूहळू बाहेर येऊ लागले. दोन महिन्यांपूर्वी गावातील अनेकांनी पाचोड पोलिसांना मुजीमचा खून करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून गावातील बबन श्यामराव डाके यांच्या गट क्रमांक ३३१ जमिनीमधील बोअरवेलमध्ये टाकल्याची खबर दिली. पोलिसांनी न्यायालयाकडे कारागृहातील तिघांचा ताबा मागितला. मात्र न्यायालयाने त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यास नकार दिला. पाच महिन्यांनंतर बोअरवेलमधून दुर्गंधी येत असल्याने पाचोड पोलिसांनी अखेर बुधवारी (२८) रोजी सकाळी बोअरवेल खोदण्याचा निर्णय घेतला.

मृतदेहाचे तुकडे आढळले
सहायक पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांनी सहकाऱ्यांसह महसूल मंडळ अधिकारी, तलाठी यांना सोबत घेऊन खादगाव गाठले व पोकलँडच्या मदतीने बोअरचे उत्खनन सुरू केले. तब्बल आठ तासांच्या अथक परिश्रमानंतर बावीस फूट खोलावर कुजलेल्या अवस्थेत मृतदेहाचे तुकडे आढळून आले. मुंडके व कमरेचा काही भाग वरच अडकल्याने दिसून आले. तर बाकीचे अवयव दोनशे फूट खोलवर गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. काशीनाथ स्वामी यांनी घटनास्थळीच उत्तरीय तपासणी केली आहे. बेपत्ता तरुणाच्या मृतदेहाचे अवशेष सापडल्यामुळे आता उपरोक्त आरोपींविरुध्द खुनाचे कलम वाढविण्यात येईल, असे सहायक पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांनी सांगितले. प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक महेश आंधळे व पोलीस उपनिरीक्षक गोरक्ष खरड, नरेंद्र अंधारे, गोरख कणसे, भगवान धांडे, शेख नुसरत आदी करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या