ट्रम्पविरोधात महाभियोग तयारी सुरू

अमेरिकन संसदेवरील हल्ल्यानंतर जगभर अब्रूचे खोबरे करून घेणारे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अखेर परिणामांना तोंड देण्याची वेळ आली आहे. संसदेने त्यांच्याविरुद्ध महाभियोगाची प्रक्रिया सुरू केली आहे. डेमोक्रेटिक पार्टीच्या तीन सिनेटर्सनी यासंदर्भात प्रस्ताव सादर केला आहे. त्याला सिनेटमधील 211 सदस्यांनी पाठिंबा दिला आहे. ट्रम्प यांच्यासाठी हा मोठा दणका मानला जात आहे.

गेल्या आठवडय़ात संसदेच्या कॅपिटल हिल इमारतीवर झालेल्या हल्ल्याला ट्रम्पच जबाबदार आहेत, हल्ल्यासाठी त्यांनीच आपल्या समर्थकांची माथी भडकावली, असा आरोप डेमोक्रेटिक पार्टीने केला आहे. जॅमी रस्किन, डेक्हिड सिसिलीन आणि टेड ल्यू या तिघा सिनेटर्सनी ट्रम्प यांच्याविरोधात सोमवारी महाभियोगाचा प्रस्ताव सादर केला.

ज्यावेळी इलेक्टोरल कॉलेजच्या मतांची मोजणी केली जात होती, त्याचवेळी ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना संसदेला घेराव घालण्यासाठी भडकावले होते. त्यांच्या चिथावणीनंतर जमावाचा उद्रेक झाल्यामुळेच इलेक्टोरल कॉलेजच्या मतमोजणीत बाधा आली, असा दावा महाभियोगाच्या प्रस्तावात करण्यात आला आहे.

दोनदा महाभियोगाला सामोरे जाणारे पहिले राष्ट्राध्यक्ष

ट्रम्प यांच्याविरोधातील महाभियोगाच्या प्रस्तावावर बुधवारी मतदान घेतले जाईल. अमेरिकन संसदेने तसे नियोजन केले आहे. हा प्रस्ताव बहुमताने मंजूर होईल, असा विश्वास डेमोक्रेटिक पार्टीला आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यास दोनवेळा महाभियोगाला सामोरे जाणारे ट्रम्प हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष असतील. त्यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या खुर्चीकरून तातडीने हटवावे, यासाठी उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांना 25 वी घटनादुरुस्ती लागू करण्याकरिता साकडे घातले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या