अंगणवाडी सेविकांना दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी करा!

सामना ऑनलाईन, मुंबई

राज्यात मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका आहेत, मात्र गेल्या अनेक वर्षांत त्यांचे मानधनापासूनचे अनेक प्रश्न प्रलंबित असून त्यांच्या मागण्या आज महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी मान्य केल्या. राज्य सरकारवर विश्वास दाखवून अंगणवाडी सेविकांनी आपले १ एप्रिलपासूनचे आंदोलन मागे घेतले. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना दिलेल्या आश्वासनाची राज्य सरकारने लवकरात लवकर अंमलबजावणी करावी अशी मागणी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेत केली.

अंगणवाडी कृती समितीने १ एप्रिल रोजी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर आज बैठक आयोजित केली होती. या बैठकीला कृती समितीच्या सदस्यांबरोबरच डॉ. नीलम गोऱ्हे व आमदार विद्या चव्हाण उपस्थित होते. या बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या अनेक मागण्या मान्य करण्यात आल्या. त्या पार्श्वभूमीवर डॉ. गोऱ्हे यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता. अंगणवाडी सेविकांचे मानधन अनेक वर्षे वाढवले जात नाही. त्यामुळे दर ठरावीक कालावधीने मानधनात वाढ करावी, मदतनीस सेविकांच्या मानधनात ७५ टक्के वाढ करावी, मिनी अंगणवाडी सेविकांना सेविकांइतके मानधन द्यावे या मागण्या मंत्रीमहोदयांनी मान्य केल्या. या मागण्यांसंदर्भातचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडून तो मंजूर करून घेण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे हा संप मागे घेण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या