दुष्काळाशी दोन हात करायला येताय ना!

344

>>मेधा पालकर<<

सामाजिक बांधिलकी समजून बऱयाच संस्था शेतकऱयांच्या आत्महत्या असोत, पाणीटंचाई असो, दुष्काळ असो अथवा कोणत्याही सामाजिक समस्या असोत, लोक पुढे येऊन जटील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. याबाबत घडणाऱया जनजागृतीचा घेतलेला हा वेध!

गेल्या वर्षी दुष्काळाचे संकट आ वासून समोर उभे ठाकले. त्यात पाऊस कमी आणि पडलेल्या पावसाचे पाणी साठविण्याकडे वेळोवेळी केलेले दुर्लक्ष याचा परिणाम म्हणजे पाण्यासाठी दाहीदिशा भटकण्याची वेळ गावकऱयांवर आली…प्यायला पाणी नाही, शेती पिकवायला पाणी नाही अशा अवस्थेत १९७५ साली पडलेल्या त्या भीषण दुष्काळाने पुन्हा एकदा आठवण करून दिली. २०१५ मधील दुष्काळाचे गडद संकट झेलत महाराष्ट्र पुढे निघाला… ‘शासनाचं काम आहे, आणतील योजना करतील कामं’ हा स्वार्थीभाव गळून पडला. गेल्या वर्षभरात प्रसारमाध्यमांमधून दुष्काळाच्या गंभीर प्रश्नावर चर्चा घडवून आणली गेली. दुष्काळाचा प्रश्न जनमानसात उमटला आणि समाजामधून श्रमदानाचे महत्त्व पटवून देणाऱया सामाजिक संस्था, ‘नाम’, ‘पाणी फाऊंडेशन’सारख्या संस्था पुढे आल्या. मग शिर्डी संस्थान असेल, मुंबईचे सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट की पुण्याचे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट. सामाजिक उत्तरदायित्व देण्यासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलण्यास सुरुवात केली. शिवाय मोठमोठय़ा कंपन्यांमधून सीएसआरअंतर्गत उपलब्ध करून दिलेला निधी सामाजिक उपक्रमांसाठी वापरला जात आहे. यामुळे समाजकार्याचा नुसताच आव आणण्यापेक्षा प्रत्यक्ष कार्यास सुरुवात झाली. सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा नवा ट्रेंड निर्माण झाला आहे हे मात्र खरं. दुष्काळाच्या गंभीर प्रश्नावर सुरू झालेली ही लोकचळवळ आता दीर्घकाळ टिकणे महत्त्वाचे ठरणार आहे.

गावागावात होत असलेल्या श्रमदानाला दानशुरांनी साथ दिली. त्यामुळे दुष्काळाने होरपळलेल्या महाराष्ट्रातील जनतेमध्ये हा नवा बदल जनजागृती आणि जलजागृती घडवितो आहे हे आशादायी चित्र सध्या निर्माण झाले आहे. शेतकऱयांची आत्महत्या, पाणीटंचाई या विषयांवर सातत्याने काम करणाऱया संस्था आजही आहेत. पण सर्वांचे लाडके ‘सेलिब्रेटी’ प्रत्यक्ष दुष्काळ निवारणाच्या चळवळीत उतरतात या भावनेनेच एक प्रकारची स्थिरता चळवळीला मिळाली. त्यामुळे दुष्काळाशी दोन हात करण्याचा निर्धार सध्याची ‘यंग जनरेशन’ करेल याची खात्री दिसते आहे. समाजकार्यात आपला प्रत्यक्ष सहभाग असला पाहिजे ही भावना खेडय़ापाडय़ातून, वाडय़ावस्त्यामधून आणि शहरातील नागरिकांमध्ये निर्माण होताना दिसते आहे. पाणीटंचाई दूर करण्यासाठी मग बंधारे बांधणे, नद्या, ओढय़ांमधील गाळ काढणे, पडणाऱया पावसाचा थेंब न् थेंब साठविण्याची आठवण करून देणारी कृतिशील पावले उचलण्याचा नवा ‘ट्रेंड’ आता रुजला आहे.

draught

राज्यातील प्रसिद्ध शिर्डी देवस्थानने विविध सामाजिक कार्यासाठी निधी दिला आहे. तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून ससून रुग्णालयासाठी देऊ केलेली मदत मोठी आहे. दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा देऊन दत्तक घेण्यासाठी  समाजातले दानशूर पुढे आले. तर माळीणसारखे गाव जेव्हा ढगफुटी होऊन जमीनदोस्त झाले तेव्हा त्याच गावकऱयांना नैराश्येतून बाहेर काढण्याचे काम भोई प्रतिष्ठानने केले. शांतीलाल मुथा यांच्या भारतीय जैन संघटनेने आत्महत्याग्रस्त शेतकऱयांच्या मुलांचे संगोपन केले आहे, दुष्काळी भागातील मुलींचे संगोपन करून त्यांचे विवाह करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य कोंढवा येथील गणेश कामठे यांची संस्था करत आहे. अशी अनेक उदाहरणे देता येतील जी सामाजिक कार्यात हिरिरीने सहभागी होत आहेत.

‘नाम’ फाऊंडेशनने शेतकऱयांसाठी उभी केलेली मदत सर्वांनाच माहिती आहे. त्यातून जमा झालेला निधी आणि त्यांचे प्रत्यक्ष आत्महत्याग्रस्त शेतकऱयांच्या कुटुंबाला उभं करण्यासाठीचे  प्रयत्न यामुळे समाजामध्ये जनजागृती झाली. अशीच प्रेरणा ‘पाणी फाऊंडेशन’ने दिली. आज गावांना विविध योजनांसाठी निधी मंजूर होतो, पण बऱयाच ठिकाणी हा निधी गावगुंडीच्या राजकारणामुळे वादात अडकून परत जातो. त्यामुळे गावाचा विकास तर सोडाच, पण समस्याही ‘जैसे थे’ अशी परिस्थिती दिसते. गावाची हीच नस बरोबर ओळखून ‘पाणी फाऊंडेशन’ने गावे टँकरमुक्त करण्याचा नारा दिला. त्यासाठी प्रत्यक्ष पैशाची मदत न देता लोकसहभाग आणि श्रमदानाला महत्त्व देणारी वॉटरकप स्पर्धा सुरू केली. या स्पर्धेने गावागावात नवचैतन्य निर्माण केले आहे.

श्रमदानाचे महत्त्व समजले

दुष्काळावर मात करण्यासाठी सर्वसामान्य माणसे पुढे आली आहेत. लोकांनी प्रत्यक्ष सहभाग देऊन सुरू केलेली ही लोकचळवळ आहे. त्यामुळे ती एकटय़ा कोणाची आहे अशी कोणतीही श्रेयवादाची लढाई यामध्ये नाही. गेल्या काही वर्षांपासून जे श्रमदान हद्दपार झालं होतं त्याला चालना मिळाली आहे. श्रमाचे महत्त्व खूप पूर्वीपासून होतं. पण मधल्या काळात जो रेडिमेडपणा आला होता तो आता दूर होतोय. दुभंगलेला समाज श्रमदानामुळे एकत्र आला आहे. गावातली शाळकरी मुले ते वडीलधारी मंडळी चांगल्या गोष्टींकडे वळली आहेत. हा खूप सकारात्मक बदल आहे.

– डॉ. अविनाश पोळ, जलतज्ञ, अभ्यासक

गावात तीन ओढे आहेत. पण पावसाळय़ातले पाणी साठवता न आल्याने ते वाहून जाते आणि नदीला मिळते. शेवटी गावातली पाणीटंचाई कायमचीच. गावाने जलयुक्त शिवार, आपलं पाणी यासारख्या योजनांमध्ये सहभाग घ्यायचे ठरवले. सध्या सर्वत्र सुरू असलेल्या सामाजिक उपक्रम करणाऱया सामाजिक संस्था, फाऊंडेशनपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न गावाने केला. त्यासाठी गावकऱयांनी पाणी प्रश्नासाठी एक व्हायचे ठरवले. आता तीनही ओढय़ांचे खोलीकरण पूर्ण करून आम्ही येणाऱया पावसाचा थेंब न् थेंब साठविण्यासाठी सज्ज झालो आहोत. खऱया अर्थाने जनजागृती आणि जलजागृती होत आहे.

– ऍड. नितीन कदम, उपसरपंच, शिरसटवाडी

जिह्याच्या विविध तालुक्यांमध्ये विहिरींमधील, नद्यांमधील गाळ काढण्याचे काम पुण्यातली ज्ञानप्रबोधिनी करत आहे. जवळपास आयटी क्षेत्रातील एक हजाराहून अधिक अभियंते आपला आठवडय़ातला एक दिवस गावात श्रमदानासाठी देतात. भोर, वेल्हे या पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये झरे खोल करण्याचे, विहीर रुंद करण्याचे, शेततळय़ांमधील गाळ काढण्याचे, दगडमाती काढण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. ज्ञानप्रबोधिनीच्या ग्रामविकास विभागाचे सामाजिक कार्य हे गेल्या 25 वर्षांपासून सुरू आहे. सामाजिक प्रश्नांवर काम करण्यासाठी लोक पुढे येत आहेत. आता दुष्काळ, पाणीटंचाई या विषयांवर दीर्घकाळ काम केले जाईल असा नवा बदल समाजात दिसतो आहे.

–  विवेक गिरधारी, ज्ञानप्रबोधिनी ग्रामीण विकास विभागप्रमुख

आपली प्रतिक्रिया द्या