शाळेच्या दिवसात चाखलेल्या फळांचं महत्व

674

dr-namrata-bharambe>> डॉ. नम्रता महाजन-भारंबे

आतापर्यंत आपण महाराष्ट्रात प्रामुख्याने पिकणारी फळे व त्यांचे आरोग्यासाठी असणारे फायदे बघितले. पण तुम्हाला आठवतं का? आपल्या लहानपणी शाळेत असतांना मधल्या सुट्टीत किंवा इतर वेळेला बोरं, चिंचा, कैरी, आवळे इ. फळे कुणीतरी विकत असायचं! जसे वय मागे पडत गेले तशी ही फळे देखील आठवणीत गेली. आज आपण या आठवणीतील फळांचे शरीराला होणारे फायदे जाणून घेऊयात! म्हणजे जेव्हा-जेव्हा ही फळे दृष्टीस पडतील तेव्हा आठवणी ताज्या करतांना आपण मनमुरादपणे त्यांचा आस्वाद घेऊ.

१. विलायती चिंचा (Pithecellobium dulce) –

विलायती चिंचांना ‘जंगली जलेबी’ किंवा इंग्लिश चिंचा असे देखील म्हणजे जाते. या चिंचेला तुरट – गोड अशी चव असते. या फळाचा उपयोग दात दुखणे, हिरड्यांचे काही विकार यावर चांगल्या प्रकारे होतो. याच्या बियांपासून निघणारे तेल साबण तयार करण्यासाठी वापरले जाते.

२. चिंच (Tamrindus indica) –

चिंच म्हटली की आपोआपच तोंडाला पाणी सुटतं. चिंच स्वयंपाक घरात बऱ्याच ठिकाणी वापरली जाते. अगदी पाणीपुरी पासून ते फोडणीच्या वरणापर्यंत चिंच गरजेची असते. चिंचेमध्ये टार्टारीक अॅसिड असते. जे अतिशय उत्तम प्रकारचे अँटीऑक्सिडंट असे कार्य करते. चिंचेचा कोळ हा अपचन दूर करते. तसेच पोट साफ करण्यास मदत करते. लहान मुलांना चिंचेचा सौम्य काढा दिल्यास जंतांचा त्रास दूर होतो.

३. जांभूळ (Syzygium cumini, Black plum) –

उन्हाळ्यात आपल्याला बाजारात जांभूळ बघायला मिळतात. जांभळाचा मधुमेहावर खूप चांगला उपयोग होतो. जांभळाच्या बियांचे चूर्ण दिवसातून २-३ वेळा गरम पाण्यासोबत घेतले असता मूत्रातून जाणरे शर्कराचे प्रमाण कमी होते. जांभळाच्या बियांमुळे असणाऱ्या ‘जांभोलिन’ या घटकामुळे हे कार्य घडते.

४. करवंद (Carissa, Carandus) –

‘डोंगराची काळी मैना’ म्हणून करवंदाची ओळख आहे. लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे अॅनेमिया मध्ये करवंद उपयुक्त आहेत. करवंद रक्तशुद्धीकर म्हणून देखील कार्य करते. करवंदामध्ये Thermogenic attribute असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी करवंदाचा उपयोग होतो.

५. खिरणी (Manilkara hexandra) –

पिवळ्याधमक रंगाची पिकलेली, गोड चवीची खिरणीची फळे अनेकांना आवडतात. हिरड्यांतून रक्त येणे, हिरड्या सुजणे, यासारख्या हिरड्या अथवा दातांच्या विकारात खिरण्या उपयोगात येतात. आयुर्वेदिक दंतमंजनामध्ये याच्या वृक्षाच्या सालीचा व बियांच्या पावडरचा उपयोग करतात.

६. रायआवळे (phyllanthus acidus, Star gooseberry)

छोट्या-छोट्या आकारचे आवळ्याप्रमाणे दिसणारी ही फळे असतात. यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, ‘क’ जीननसत्व मुख्यत्वे असतात. त्यामुळे ‘स्कर्वी’ या त्वचेच्या आजारात ही फळे उपयुक्त असतात. शरीरातील सुज तसेच oxidative stress कमी करण्याचे कामदेखील ही फळे करतात.

७. शिंगाडे (Eleocharis dulcis, Water chestunt)

जसा हिवळा सुरु होतो शिंगाडे बाजारात हजेरी लावतात. ही एक समुद्री किंवा पाणथळ जागी होणारी वनस्पती आहे. ५ शिंगाड्यांमध्ये जवळपास दिवसभरातील आवश्यक पोटॅशिअमच्या मात्रेपैकी ५% मात्रा असते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यासाठी शिंगाडे Thyroid gland ची कार्यक्षमता योग्य ठेवण्यास मदत करतात.

८. ताडगोळे (Borassus flabellifer, ice apple) –

उन्हाळ्यात आपल्याला ताडगोळे दिसतात. प्रत्येकी १०० ग्रॅम फळांमध्ये जवळपास ८७% पाण्याचे प्रमाण असते. म्हणूनच उन्हाळ्यात ताडगोळे शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवते. ताडगोळ्यांमध्ये सोडिअम, पोटॅशिअम, फॉस्फरस, कॅल्शिअम हे घटक प्रामुख्याने आणि झिंक व आयर्न काही प्रमाणात असल्यामुळे घामावाटे होणारे पाण्याचे व खनिजांचे उत्सर्जन भरुन काढायचे काम ताडगोळे करतात. यामध्ये असलेले पोटॅशिअम यकृतातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यासाठी मदत करते.

९. बेलफळ

बेलाच्या पानाला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच बेलाचे फळ देखील महत्त्वाचे आहे. बेलाच्या फळात औषधी गुणधर्म असतात. बेलाचे फळ हे पूर्ण पिकल्यावर त्याचे सरबत किंवा अवलेह तयार करुन ते वापरतात किंवा नुसते देखील बेलफळ खाऊ शकतात. अतिसार, हिमोग्लोबीनची कमतरता यांवर बेलफळ गुणकारी आहे.

१०. कवठ

बेलासारखेच दिसणारे कवठाचे फळ असते. कवठाची गुळ, तिखट, मीठ घालून केलेली चटणी किंवा कवठाचे लोणचे अश्या प्रकारे कवठ खाल्ले जाते. या फळांचा डिंक हा मुरुमांसाठी फायदेशीर असतो. वारंवार लागणाऱ्या उचक्या बंद होण्यासाठी कवठ खाऊ शकतात. उन्हाळ्यात कवठाच्या फळाचा गर मधासोबत घेतल्यात तृष्णाशामक म्हणून कार्य करतो.

आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. [email protected]

फोन क्र. ९८२०२१५७९६

 

आपली प्रतिक्रिया द्या