लेख – प्रासंगिक – एकत्र कुटुंबाची गरज

>> सत्येंद्र राठी

पसायदानमध्ये साऱ्या जगाचे कल्याण व्हावे, अशी करुणा भाकणाऱ्या माऊलीचे पाईक आपण. ‘वसुधैव कुटुंबकम्’ अशी हाक देणारी आपली संस्कृती. कित्येक पिढय़ा एकत्र कुटुंब पद्धतीने, गुण्यागोविंदाने राहण्याच्या आपल्या या परंपरेला मागील काही दशकांत आपण छेद देऊ लागलो आहोत.

प्रेम आणि त्यागावर चालणाऱ्या एकत्रित कुटुंब व्यवस्थेवर व्यक्तिगत स्वार्थाचे सावट पडले आणि घरे दुभंगली. त्याची नाना कारणे सांगता येतील. उसवत चाललेल्या संवेदना, राहणीमानातील तफावत, जगण्याचे झालेले यांत्रिकीकरण, साचत असलेला स्वयंवाद. ओशो म्हणत की लव मॅरेजमध्ये ‘पत्नी’ घरात येते,  तर ऍरेंज मॅरेजमध्ये ‘सून’. आपणही ढोबळमानाने बघितल्यास पत्नी नवऱ्याचा, स्वतःचा आणि मुलांचा विचार अधिक करते, तर सून संपूर्ण कुटुंबाचा. असो, हा चर्चेचा वेगळा विषय होऊ शकेल. एकूण काय तर भौतिकवादाच्या मागे लागत आपण आपल्या या वारशापासून फारकत घेऊ लागलो आहोत. त्यासाठी निरनिराळ्या सबबी पुढे करू लागलो आहोत. नव्या बदलत्या जीवनशैलीने एकत्र कुटुंब व्यवस्थेचा पाया ठिसूळ करून टाकलाय. आधी दोन-तीन पिढय़ा, पाच-पंचवीस लोक, दाटीवाटीने पण समरसून राहत. बदलत्या परिस्थितीत आज लोक कमी, घरं मोठी आणि कवाडे बंद असे दृश्य नजरेस पडू लागलेय. एकत्र कुटुंबाची गरज ती काय? त्याने साध्य ते काय? असा प्रश्न नव्या पिढीला असू शकतो, याचे नेमके उत्तर, तुम्हाला मला आपल्या शरीराकडून समजून घेता येऊ शकेल.

‘जसे डोळ्यांना न दिसणारी वस्तू स्पर्शाने सापडते. मस्तकाला वळायचे असेल तर मान आधार देते. नाकातून घेतला गेलेला वास तोंडाला पाणी आणतो. पायाला मार लागल्याच्या वेदना डोळ्यांतून व्यक्त होतात. पोटात कळ आली, तर दोन्ही हात पोटाला धीर देऊ लागतात.’

यात जर एखादे अवयव निकामी झाले तर शरीराच्या कार्यक्षमतेवर मर्यादा येतात. एकत्र कुटुंबाचे असेच आहे. आपली अशी काळजी वाहणारी मंडळी सोबत असली की जगणे रसरशीत होत जाते. पण आपण स्वतःला यापासून दूर लोटून दिले आणि कुटुंब व्यवस्था विस्कळीत झाल्याचा परिणाम समाज व्यवस्थेवरही पडू लागला. संयुक्त कुटुंब व्यवस्था लयास जाण्याबरोबर नव्या पिढीत चरित्र निर्माण करण्याचे, संस्कार बिंबवण्याच्या कृतीला बांध घातला गेला.

सगळीकडे असुरक्षिततेच्या भावनेने, एकटेपणाच्या भीतीने शिरकाव केला. पैशाचा प्रभाव वाढला आणि संयम, लवचिकता,औदार्य, तडजोड, आदींना तिलांजली देत आपण मनाचे दुरावे वाढविण्याच्या मार्गावर अग्रेसर झालो. संवाद तर दूर, इतर सदस्यांचे ऐकून घेण्याची तस्दी घेण्यास आपण इच्छुक राहिलो नाही.

माणसाकडे कितीही पैसा असला तरी पैसा हा सोबतीचा पर्याय होऊ शकत नाही. माणसाला माणूस हा लागतोच आणि अशा माणसानेच कुटुंब बनते. एकत्र कुटुंब अर्थात एकाच घरात राहणे असे इथे अभिप्रेत नाही; आजच्या काळात असा आग्रह धरणे वेडेपणाचे ठरेल; पण नियमित संपर्कात राहणे, व्यवहारापेक्षा भावनेला महत्त्व देणे, अपेक्षा कमी ठेवणे, सर्वांना सामावून घेण्यासाठी प्रयत्नशील राहणे, अशा साध्या सोप्या उपचाराने कुटुंब बांधून ठेवणे सोपे होऊ शकते. विभक्त असूनही सौहार्दाने राहिलो तर एकत्र कुटुंबात असल्याचा आस्वाद माफकपणे घेता येईल. अगदी सूर्यफुलासारखे…. सूर्य जसा जसा पुढे सरकतो, तस तसे सूर्यफूल आपले तोंड त्या दिशेला करीत असते. अशाने त्यांना सूर्याचा प्रकाश सरळ ग्रहण करता येतो; पण जेव्हा ढगाळ पावसाळी वातावरणात सूर्य पूर्णपणे झाकला जातो, त्या वेळी काय घडते? त्यावेळी ही सूर्यफूलं एकमेकांसमोर वळतात आणि एकमेकांस ऊर्जा देतात. एकमेकांचा सांभाळ करतात. संकट समयी असा कोणी आपला, आपल्या समोर असल्यास अरिष्टाची तीव्रता नक्कीच क्षीण होते.

वेळीच घेतलेला लहानसा पुढाकार किंवा मोक्यावर घेतलेली किंचितशी माघार कुटुंबीयांत जवळीक वाढविण्यास उपकारक ठरू शकते. कुटुंब ही जीवनाच्या प्रत्येक वळणावर टेकू देणारी प्रणाली. याची शक्य तशी, जमेल तितकी जपणूक करायला हवी. आपली काळजी घेणारं कोणी आहे, ही भावना जगण्यास उमेद देते. तर्क आणि व्यवहारापेक्षा भावनांना जपा. हा घटक सगळ्यांना जोडून ठेवतो. एकत्र राहणे शक्य नसेलही, पण एकत्र येणे तरी साध्य करा.

 

आपली प्रतिक्रिया द्या