‘भविष्या’साठी केवळ राशीवर अवलंबून राहाल तर फसाल!

anupriya-desai-astrologer>> अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तू विशारद)

राशीवरून स्वभाव सांगणे वेगळे आणि भविष्य वर्तवणे वेगळे. कारण राशी हा कुंडलीचा एक भाग झाला परंतु तुमचे भविष्य वर्तवण्यासाठी संपूर्ण कुंडलीचा अभ्यास करावा लागतो. त्यासाठी राशी म्हणजे काय आणि कुंडली म्हणजे काय हे समजून घ्यायला हवं.

 

‘भविष्य’ हा शब्द भुलवणारा आहे आणि विशेषतः हिंदुस्थानी लोकांच्या आवडीचा विषय. वर्तमान कसे सुधारता येईल यापेक्षा माझ्या भविष्यात काय लिहिले आहे ह्या मध्ये आपल्याला स्वारस्य आहे. त्यामुळे कुठल्याही समारंभात गेले की नातेवाईक आणि मित्रमंडळींचे मला भरपूर प्रश्न असतात – ‘माझी राशी मेष आहे. हे वर्ष कसे राहील माझ्यासाठी? ह्या वर्षी घर घ्यायचं म्हणतोय? काय म्हणते माझी राशी? मी नवीन नोकरीच्या शोधात आहे परंतु मला परदेशातील नोकरी हवी. माझ्या राशीला साडेसाती सुरू आहे मग होईल का माझे हे काम?’. हे आणि असे अनेक प्रश्न जातक विचारतात आणि केंद्रबिंदू असते त्यांची राशी.

माझ्याकडे येणाऱ्या जिज्ञासू व्यक्तींना माझे हे सांगणे असते की तुम्ही नुसत्या राशीवर अवलंबून राहू नका. राशीवरून स्वभाव सांगणे वेगळे आणि भविष्य वर्तवणे वेगळे. कारण राशी हा कुंडलीचा एक भाग झाला परंतु तुमचे भविष्य वर्तवण्यासाठी संपूर्ण कुंडलीचा अभ्यास करावा लागतो. त्यासाठी राशी म्हणजे काय आणि कुंडली म्हणजे काय हे समजून घेऊ.

राशी म्हणजे काय?

कुंडलीतून एकूण बारा राशींचा समावेश असतो. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन. आपल्या जन्माच्या वेळेस चंद्र ज्या राशीत असतो ती तुमची राशी. जर तुमच्या जन्माच्या वेळेस चंद्र सिंह राशीत असेल तर तुमची राशी आहे सिंह.

आयुष्यात एकदा तरी शनिची साडेसाती यावी!

चंद्र हा उपग्रह असला तरी ज्योतिष-शास्त्रात त्याला ग्रह मानून कुंडलीचा अभ्यास केला जातो. प्रत्येक ग्रहाला स्वतःची एक गती असते. सर्वात धीम्या गतीचा ग्रह आहे शनि. शनिला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यास सुमारे अडीच वर्ष लागतात. गुरू ग्रहाला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी एक वर्ष लागते. मंगळ दीड महिन्यांनी राशी बदलतो. बुधाला एक राशी पार करण्यास साधारणपणे ३० दिवस लागतात. आणि सर्वात जलद गतीचा ग्रह म्हणजे चंद्र कारण चंद्र एका राशीत फक्त सव्वा दोन दिवस असतो. त्यामुळे ह्या सव्वा दोन दिवसात ज्यांचा जन्म होतो त्यांची राशी ही एकच असते. म्हणजे समजा तुमचा जन्म १५ तारखेचा आहे आणि त्या दिवशी चंद्र मेष राशीत असेल तर तुमची राशी आहे मेष. चंद्राचे भ्रमण एका राशीतून दुसऱ्या राशीत होण्यास सव्वा दोन दिवस लागतात हे आपण वर वाचलेच. मग ह्या सव्वा दोन दिवसात ज्यांचा जन्म होतो त्या सर्वांची राशी असणार आहे मेष. म्हणजेच १४ तारखेला ज्यांचा जन्म झाला त्यांचीही राशी मेषचं असणार आहे आणि १६ तारखेला सकाळी ज्यांचा जन्म झाला असेल त्यांची राशी मेष असणार. परंतु मंडळी आता विचार करा ह्या सव्वा दोन दिवसात जन्म झालेलय सर्वांची राशी जरी एकच असली तरी भविष्य एकच असणार आहे का? नाही ना!

kundali
कुंडली

जुळ्या मुलांचीही राशी एकच असते परंतु जुळ्या मुलांचे भविष्य सारखेच आहे असे अनुभवले आहे का तुम्ही? जुळ्या मुलांचा स्वभावही एक सारखा नसतो, आवड सारखी नसते. एकाला एक आवडते तर दुसऱ्याला काही वेगळेच. एकाचे लग्न आधी होते तर दुसऱ्याला त्याच वेळेस परदेशातील नोकरीची संधी येते. काही वेळेस तर माझ्या पाहण्यात असे आहे की जुळ्यांपैकी एकचा संसार व्यवस्थित सुरू आहे आणि दुसऱ्याचा घटस्फोट झालेला आहे. म्हणजे ह्याचा अर्थ असा की राशीवरून भविष्य सांगता येणार नाही. पटतयं का? म्हणूनच राशी नव्हे तर कुंडली महत्त्वाची ठरते. कुंडलीच्या ‘बारा’ घरातून असणारे ‘नऊ’ ग्रहांचे भ्रमण अचूक भविष्य वर्तवण्यास उपयोगी ठरते. म्हणूनच पुढच्या वेळेस ज्योतिषाला राशीवरून नव्हें तर कुंडलीवरून भविष्य वर्तवण्यास सांगण्यास विनंती करा.

अधिक माहितीसाठी [email protected] येथे संपर्क करावा.

 

आपली प्रतिक्रिया द्या