माझगावचा किल्ला -एक आठवण

124

<<महादेव गोळवसकर>>

मुंबईतील ‘डॉकयार्ड रोड’ रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या टेकडीवर एकेकाळी किल्ला होता. माझगावचा किल्ला एक एतद्देशीय मुंबई बेटांबरोबर तो पोर्तुगीजांकडून इंग्रजांना मिळाला. माझगावचा किल्ला नष्ट झाला तो मोगलांच्या युद्धखोरपणामुळे. नंतरच्या काळात इंग्रजांनी मुंबईपेक्षा कोलकात्याच्या उभारणीकडेच लक्ष दिले, त्यामुळे माझगावच्या किल्ल्याकडे दुर्लक्ष झाले असावे. पेशवाईच्या ऱहासाच्या काळात इंग्रज चांगलेच प्रबळ बनले. १८१८ साली पेशवाई बुडाल्यानंतर त्यांना माझगावच्या किल्ल्याची आवश्यकता उरली नाही! एकेकाळी या ठिकाणचा किल्ला शत्रूच्या हाती पडला तर काय करायचे अशी भीती बाळगणाऱया ब्रिटिशांनी १९व्या शतकात येथे बगिचा बनवण्याची योजना आखली आणि ती अमलात आणली. १८८०-८४ या काळात ब्रिटिशांनी येथे एक पाण्याची टाकी बांधली. या टाकीस जॉन हे ग्रॅण्ट यांचे नाव देण्यात आले आहे.

१९२५मध्ये या टाकीची क्षमता २० दशलक्ष गॅलन इतकी वाढविण्यात आली. हे क्षमता वाढविण्याचे काम मे. तेजोकामा ऍण्ड कंपनी या संस्थेने एच. बी. क्लेस्टन हे म्युनिसिपल कमिशनर असताना केले. डब्ल्यू. ए. निवेन यांनी या प्रकल्पात हैड्रोलिक इंजिनीयर म्हणून काम पाहिले. हा किल्ला आज अस्तित्वात नाही. या किल्ल्याचे कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत. मात्र पूर्वी ज्या जागी किल्ला होता त्या जागी मुंबई महानगरपालिकेची बाग आहे. या बागेचे क्षेत्रफळ लक्षात घेता मुंबईच्या मुख्य किल्ल्यानंतर विशालतेच्या दृष्टीने या किल्ल्याचा क्रमांक लागतो. किल्ल्यातून दक्षिणेस कुलाबा बेटापर्यंत, पश्चिमेस वरळीपर्यंत व उत्तरेस अगदी शिवडीपर्यंत मुलुख दिसत असणार. या किल्ल्यावर जिवंत झरे असलेल्या विहिरी होत्या. जेव्हा मुंबई बेटांच्या स्वरूपात होती त्यावेळी तर हा किल्ला अत्यंत मोक्याच्या जागी होता. किल्ल्याच्या जागी आज बाप्तिस्ता बाग असून ती मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात आहे.

याच परिसरात श्री गावदेवी वैकुंठमाता मंदिर आहे. मंदिरात दररोज शेकडो भाविक दर्शनाकरिता येतात. भांडारवाडा जलाशय माझगाव म्हणून हा परिसर ओळखला जातो. ३५० वर्षांपूर्वी येथे चिमाजी अप्पा राहून गेले म्हणून भांडारवाडा म्हणतात असे या परिसरात वास्तव्य करणाऱया नागरिकांनी सांगितले. हा संपूर्ण परिसर पुरातन जतन वास्तू विभागाच्या अधिपत्याखाली असायला हवा होता. फार प्राचीन इतिहास या परिसराला आहे. संपूर्ण परिसर स्वच्छ निटनेटका असायला हवा, येथे कोणतीही अनधिकृत निवासी, व्यावसायिक बांधकामे होऊ नयेत म्हणून शासनाने या प्राचीन परिसराचे वास्तव कायम जतन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या परिसराचे महत्त्व कायम जतन करण्यासाठी नवीन विकास आराखडा तयार करून धोरण अमलात आणावे. तेव्हाच माझगाव किल्ल्याचे महत्त्व मुंबईकरांना माहीत होईल. शासनाला विनंती आहे की या ऐतिहासिक स्थळाला पर्यटनस्थळ म्हणून विकसित करावे. मुंबईच्या पर्यटनस्थळात नव्याने भर पडेल.

 

आपली प्रतिक्रिया द्या