बेबी पावडर पेक्षाही वेखंड जास्त फायदेशीर

2354

jyotsna-gadgil>>ज्योत्स्ना गाडगीळ

उन्हाळ्यात भरगच्च भरलेल्या लेडीज कंपार्टमेंटमधून ट्रेनप्रवास, म्हणजे जिवंतपणी नरकयातना! पर्फ्युमचे, अत्तराचे, पावडरींचे, तेलाचे, शॅम्पूचे, कंडिशनरचे, कॉस्मेटिक्सचे सुवास घाममिश्रित झाल्याने वातावरण कुबट्ट, कुजट्ट होऊन जातं. घामाच्या धारांनी अंगाचा पुरता चिकचिकाट झालेला असतो. वारा येण्यासाठी कम्पार्टमेन्टची खिडकीच काय, तर दारही अपुरं पडतं. अशात आपला जीव गुदमरतो, तर तान्ह्या बाळाचे का नाही हाल होणार?

ट्रेन सुटत असताना शेवटच्या क्षणाला सासू-सुनेची जोडी तान्ह्या बाळाला घेऊन ट्रेनमध्ये चढली. सासूबाईंनी टिपेचा सूर लावला, ‘हातात बाळ आहे, आत जायला जागा द्या.’ सुनबाई गर्दी लोटत कम्पार्टमेन्टमध्ये शिरली.

‘एवढ्या गर्दीत चढायची काही गरज होती का?’ अशा आविर्भावात समस्त महिलांनी त्या दोघींवर त्रासलेला कटाक्ष टाकला. पण कोणीही जागची ढिम्म हलली नाही. बाळ एव्हाना रडून रडून लालेलाल झालं होतं. सुनबाईंनी पंख्याखालची जागा पटकावून पायांचा तंबू ठोकला. बाळाचं दुपटं घामाने भिजलं होतं. ते अलगद काढून घेतलं. अंगाला वारा लागल्यावर बाळाने चार हुंदके गिळले. तरीदेखील आपण कम्फर्ट झोन मध्ये पोहोचलो नाहीये, हे लक्षात आल्यावर पुन्हा त्याने भोकाड पसरले. सुनबाईंना काय करावं सुचत नव्हतं.

बाळाचा आक्रोश ऐकून खिडकीजवळ बसलेल्या बाईने ‘सीट घे, पण बाळ आवर’ अशा मुद्रेने त्या माउलीला बसायला जागा दिली. बाळ आपलं ऐकणार नाही, हे लक्षात घेत सुनबाईंनी ‘आई तुम्हीच बसा आणि बाळाला मांडीवर घ्या’ असं म्हणत सासूबाईंच्या हाती सूत्रं सोपवली.

दोन बाळांच्या संगोपनाचा पूर्वानुभव असलेल्या सासूबाईंनी, अर्थात बाळाच्या आजीने तान्हुल्याला मांडीवर घेतलं. आजीच्या हातात आल्यावर खट्याळ बाळ खुद्कन हसलं. त्याच्या हसण्याने उपस्थित सगळ्या जणींचा जीव भांड्यात पडला. मोबाईल बॅगेत ठेवून तरण्या मुलीही आजी-नातवाचं विलोभनीय दृश्य पाहू लागल्या. आजीबाईंनी बाळाशी गप्पा मारायला सुरुवात केली.

‘आईला की नाही काही कळतच नाही. एवढ्या गर्दीत कशाला घेऊन जायचं आम्हाला? हे काय आपलं प्रवासाचं वय आहे?’

‘हूsss ‘ – बाळाने प्रतिसाद दिला.

‘पण काय करणार? डॉक्टर काकांचा फोन आला, आईच्या बाबांना बरं नाहीये, म्हणून लगेच आपल्याला निघावं लागलं….’

(हे वाक्य बाळासाठी नसून आपल्यासाठी होतं, याची उपस्थित बायकांना कल्पना आली.)

‘लवकर पोहोचू हं आपण. कित्ती घाम आलाय माझ्या बाळाला. असं जाणार का आजोबांना भेटायला? थांब छान तीट-पावडर करूया.’

आजीने एक एक वस्तू मागावी, आईने पोतंसदृश बॅगेत हात घालून ती आजीच्या हाती द्यावी.

पांढऱ्या शुभ्र सुती रुमालाने आजीने बाळाचं अंग पुसून घेतलं. गोलाकार पावडरच्या डबीतून, पफने बाळाच्या सर्वांगावर जॉन्सन बेबी पावडरचा मारा केला.

पावडरीच्या सुवासाने लेडीज कम्पार्टमेन्टचे क्षणात नर्सिंग होम झाले. आजीने बाळाला छानसं गुलाबी झबलं घातलं. त्याची नॅपी तपासून पाहिली आणि पुन्हा एकदा मऊसूत दुपट्यात अलवार गुंडाळून घेतलं. वाळा घातलेलं पाणी वस्त्रगाळ करून बाळाच्या बाटलीत भरलं आणि त्याला प्यायला दिलं.

सगळी ब्युटी ट्रीटमेंट झाल्यावर आजीने डोळ्याकडे तर्जनी नेत काजळाचं बोट बाळाच्या कानशिलामागे टेकवलं आणि दोन बोटात दोन्ही गाल धरून बाळाचा पापा घेतला.

बाळाची आई तिच्या बाबांच्या आठवणीने मुसमुसत होती. आजी बाळाला म्हणाली, ‘आईला सांग, रडू नको, नाहीतर आजोबांना बरं कसं वाटेल? तिला विचार, तुलाही तीट-पावडर करून देऊ का?’

सुनबाईसह सगळ्या जणी आजींच्या मिस्कील बोलण्यावर हसू लागल्या. आईला हसताना पाहून बाळही खळखळून हसलं. तिघांची उतरण्याची वेळ आली. आजींनी सुनबाईंकडे आणखी एक डबी मागितली. डबीचं झाकण उघडताच सुंगधी दरवळ पसरला. डबीत कसलीशी पावडर होती. त्यात चिमूट बुडवून आजीने ती चिमूट बाळाच्या टाळूवर गोलाकार फिरवली. मग दुपट्याची टोपी सारखी करून आजी बाळाला घेऊन जागेवरून उठली.

एकीने न राहवून आजीला विचारलं, ‘काय ऑस्सम स्मेल होता, कसला होता आजी?’

‘वेखंड म्हणतात त्याला. तुम्ही लहान असताना तुमच्या आजीनेपण तुमच्या टाळूवर ह्या ऑस्सम स्मेलची पूड फिरवली असेल. ही पूड लावल्याने उष्णता बाधत नाही, डोकं शांत राहतं. तुम्ही आता तो स्मेल विसरलात, हरकत नाही पण आजीला विसरू नका. तिच्याकडे असे अनेक स्मृतिगंध तुम्हाला सापडतील.’

आजीचं बोलणं कळल्यागत खांद्यावर टाकलेलं बाळ सगळ्यांकडे बघत हसलं, बायकांनी दुरूनच बाळाचे पापे घेतले. ते तिघे उतरले.

मात्र वेखंडाचा सुवास कंपार्टमेंटमध्ये मंदपणे दरवळत राहिला.

आपली प्रतिक्रिया द्या