गव्हांकुर – निसर्गाचे वरदान

2157

dr-namrata-bharambe>> डॉ. नम्रता महाजन भारंबे

गव्हांकुर हे अगदी प्राचीन काळापासून त्यांच्या औषधी उपयोगासाठी प्रसिद्ध आहेत. हिंदुस्थानच्या सांस्कृतिक व अध्यात्मिक इतिहासात गव्हांकुरांना प्रतिष्ठेचे स्थान आहे ते दरवर्षी नवरात्रीमध्ये होणाऱ्या ‘घटस्थापने’मध्ये.

गव्हांकुरांवरील संशोधन व त्यांना जगविख्यात करण्याचे श्रेय हे आताच्या आधुनिक काळात डॉ. अॅन विगमोर, बोस्टन, अमेरिका यांना जाते. गव्हांकुरांना त्यांनी ‘एक नैसर्गिक पुर्णान्न’ असे संबोधले आहे.

मोड आलेले गहू मातीमध्ये लावल्यानंतर ७व्या दिवशी त्यांचा उपयोग करता येतो. या स्टेजमध्ये गव्हांकुरामध्ये जास्तीत जास्त पोषक द्रव्ये सामावलेले असतात. ७व्या दिवशीच्या या गव्हांकुरांमध्ये मातीमधील १०८ घटकांपैकी ९२ घटक आढळतात. तसेच क्लोरोफीलचे प्रमाण सुद्धा सर्वाधिक असते.

व्हीटग्रास चिकित्सेच्या जनक डॉ अॅन आणि अमेरिकेतील आहारशास्त्रज्ञ व ग्रास एक्सपर्ट डॉ. आर्प थॉमस या दोघांनी मिळून अभ्यासाअंती असा निष्कर्ष काढला की, ‘गव्हांकुर’ हे सर्वश्रेष्ठ प्रतिचे गवत असून त्यामधून मनुष्याला जीवनावश्यक अशी सर्व पोषक द्रव्ये मिळतात. उत्तम प्रतिच्या २३ किलो पालेभाज्यांमधून जेवढे पोषक द्रव्ये मिळतील तेवढे घटक एक किलो गव्हांकुरांमधून प्राप्त होतात.

गव्हांकुर घरच्या घरी तयार करता येतात. बाजारात व्हीटग्रास पीवडर देखील मिळते. पण ताजा गव्हांकुर ज्यूस हा जास्त आरोग्यदायी ठरतो. घरी ८ समान आकाराच्या उथळसर पसरट कुंड्या आणून त्यात माती व शेणखत एकत्र करुन भरावे. रोज एका कुंडीत गहू भिजवून पेरावे. अशाप्रकारे दर ७व्या दिवशी त्या कुंडीतील गव्हांकुर वापरता येऊ शकतात. कुंडीतील गव्हांकुर वापरल्यावर एक दिवस त्या कुंडीतील माती वर-खाली करुन उन्हात ठेवावी व दुसऱ्या दिवशी गहू पेरावे. गव्हांकुरांमध्ये पुढील प्रमाणे पोषक घटक असतात.

१. ‘अ’ जीवनसत्व – डोळे व त्वचेच्या आरोग्यासाठी अत्यावश्यक असे जीवनसत्व.

२. ‘ब’ जीवनसत्व – मज्जासंस्था व पचनसंस्थेच्या विकारात उपयुक्त

३. ‘क’ जीवनसत्व – दात, हिरड्या व हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक घटक. तसेच जखमा भरुन येण्यासाठी उपयोगी.

४. ‘ई’ जीवनसत्व – हृद्य व रक्तवाहीन्यांना सदृढ ठेवते. शरीरातील चरबीचे प्रमाण संतुलित ठेवते.

५. प्रोटीन्स व अमिनो अॅसिड्स – पेशी निर्मीती व शरीराच्या वाढीसाठी अपयुक्त.

६. क्लोरोफील – ७० टक्के क्लोरोफील व्हीटग्रासमध्ये असते. क्लोरोफीलपासून मिळणारे मॅग्नेशियम शरीरातील एन्झाईम निर्मितीसाठी आवश्यक असते. तसेच क्लोरोफील हे उत्तम जंतनाशक असल्यामुळे ते त्वचाविकार, क्षय, अल्सर, कोलायटीस, इ. आजारांमध्ये उपयोगी पडते.

७. फायबर – गव्हांकुरांमध्ये soluble व insoluble असे दोन्ही प्रकारचे फायबर प्रभूत मात्रेमध्ये असतात.

८. क्षार – शरीरात क्षारांची निर्मिती होत नाही त्यामुळे शरीरातील क्षारांची गरज ही आहाराद्वारेच पूर्ण होते. गव्हांकुरांमध्ये कॅल्शिअम, लोह, सोडीयम, पोटॅशिअम, झिंग, सेलेनियम इ. क्षार असतात.

व्हीटग्रास अथवा व्हीटग्रास पावडर घेतांना ते नेहमी सेंद्रिय मातीमध्येच उगवले असल्याचा आग्रह जरुर असावा कारण सेंद्रिय मातीमधील गव्हांकूरांची चव ही गोडसर असते मात्र रासायनिक जमिनीत उगवलेले गव्हांकूर हे तुरट असतात, त्यामुळे कधी कधी उलट्या व जुलाब होऊ शकतात.

आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. [email protected] 

फोन क्र. ९८२०२१५७९६

आपली प्रतिक्रिया द्या