ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाचे !

सामना ऑनलाईन,मुंबई

आपण आपल्या घरातील ज्येष्ठांची काळजी घेतोच. पण शासन दरबारीही त्यांच्यासाठी सोयी-सवलती आहेत. यामुळे जगणं अधिक सुलभ… सुकर होईल.

आयुष्याच्या संध्याकाळी माणसाला नेमकं काय हवं…? थोडा आराम, थोडा विरंगुळा आणि मनाप्रमाणे फिरण्याचं सुख… मात्र निवृत्तीनंतर मुलांची, सुनेची किंवा नातवंडांचीही बऱयाच जणांना बोलणी ऐकावी लागते. तसं होऊ नये यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी निरनिराळ्या योजना आखल्या गेल्या आहेत. ६०  हून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना वार्धक्यात अधिक सुरक्षित व सन्मानजनक जीवन जगता याके. यासाठी  बऱ्याच सोयी-सवलती आहेत. शिवाय दारिद्ररेषेखालील ज्येष्ठांनाही आजारपणात चांगली आरोग्य सेवा, अपंगत्वावर मात करणारी उपकरणे, आरोग्य विमा आदी सुविधा पुरवण्याचा संकल्पही या धोरणात आहे.

वृद्धाश्रम’ योजना
ज्येष्ठ नागरिकांना मुलाच्या घरात राहणे अशक्य झाले असेल तर त्यांच्यासाठी वृद्धाश्रमाची व्यवस्था केलेली आहे. यामुळे अनाथ, निराधार, निराश्रित ज्येष्ठ नागरिकांचे जीवन जगणे सुसह्य होऊ शकते. त्यांना हक्काचा निवारा मिळू शकतो. १९६३ सालीच याबाबतचा कायदा करण्यात आला आहे. हे वृद्धाश्रम स्वयंसेवी संस्थांमार्फत अनुदान तत्त्वावर चालवले जातात. स्वयंसेवी संस्थांकडून चालवण्यात येणाऱया वृद्धाश्रमात ज्येष्ठांना दर महिन्याला केवळ ९०० रुपये द्यावे लागतात. मात्र त्यासाठी  जिह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद व संबंधित संस्था यांच्याकडे जावे लागेल.

अटल पेन्शन योजना
हिंदुस्थान सरकारतर्फे ‘अटल पेन्शन योजना’ चालवली जाते. ही योजना हिंदुस्थानातील कोणताही नागरीक करू शकतो.  त्यासाठी अर्जदाराचे किमान एखादे बँक खाते असणे आवश्यक आहे.

ज्येष्ठांना ओळखपत्र देणे
६०वर्षे पूर्ण झालेल्या जेष्ठ नागरिकांना अनेक प्रकारच्या सोयी व सवलती  आहेत. त्यातच सर्वप्रथम त्यांना ज्येष्ठ नागरीकाचे ओळखपत्र देण्याची सोय ठेवली आहे. या ओळखपत्रामुळे ज्येष्ठांना बसेस, रेल्वे, सरकारी रुग्णालये वगैरे ठिकाणी सहज सवलत घेता येऊ शकते.

‘मातोश्री वृद्धाश्रम’ योजना
राज्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘वृद्धाश्रम’ योजना १७ नोव्हेंबर १९९५ रोजी सुरु करण्यात आली.  या वृद्धाश्रमांमध्ये  ज्येष्ठांना सगळ्या सुखसोयी मिळू शकतात. यातील प्रत्येक वृद्धाश्रमात १०० ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश दिला जातो. यातील ५० टक्के ज्येष्ठांना विनामूल्य प्रवेश दिला जातो. तर उरलेल्या ५० टक्के ज्येष्ठांकडून नाममात्र पैसे घेतले जातात.

राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना
केंद्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी, आई-वडील, ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थासाठी २००७ साली कायदा मंजूर केला आहे. त्यानंतर १ मार्च २००९पासून तो लागू करण्यात आला. यात ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या पाल्यांकडून (मुलगा असो वा मुलगी) निर्वाह खर्च (मेंटेनन्स) देण्याची तरतूद आहे.

बस पास
मुंबई शहर आणि उपनगरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी बेस्ट’ बसने प्रवास करताना मासिक आणि त्रैमासिक पास शुल्कामध्ये ५० टक्के सवलत देण्यात येते.

विमान प्रवास
ज्येष्ठ नागरिकांसाठी अगदी खासगी विमान प्रवासातसुद्धा भरपूर सवलती आहेत. 65 वर्षे व त्यावरील हिंदुस्थानी ज्येष्ठ नागरिक पुरुष आणि ६३ वर्षे व त्यावरील भारतीय ज्येष्ठ नागरिक  स्त्रिया योजनेकरिता पात्र आहेत. याकरिता वयाचा दाखला, मतदार ओळखपत्र, शिधापत्रिका ही कागदपत्रे आवश्यक आहेत. जाण्याच्या किमान ७ दिवस आधी कन्फर्म तिकिटे खरेदी करणे आवश्यक आहे.

सवलतीसाठीच्या अटी
केवळ हिंदुस्थानात राहणारे नागरिक
राऊंड ट्रीप/सर्कल ट्रीप प्रवासास परवानगी
जाण्याच्या ठिकाणी किमान ७ दिवस वास्तव्य
मार्ग बदलास परवानगी नाही.

रेल्वे प्रवास
रेल्वे विभागाच्यावतीने ६० वर्षावरील पुरुषांसाठी रेल्वे तिकीटात ४० टक्के सूट मिळते. तर महिलांसाठी ही वयोमर्यादा ५८ असून महिलांना ५० टक्के सुट मिळते. नव्या अध्यादेशानुसार १ एप्रिलपासून ज्येष्ठ नागरिकांना ही सवलत मिळवण्यासाठी बंधनकारक करण्यात आले आहे. याकरिता आधार कार्ड असणे सक्तीचे आहे.