दखल : बोलक्या संवादाचा ठसा

>>डॉ. ऋता देशमुख-खापर्डे

जुईच्या ताटव्यातून हळुवार सुगंध यावा आणि त्या सुगंधाचा पाठलाग करीत आपली पावलं त्या बगिच्याकडे वळावी असंच काहीसं अजित मालंडकर यांच्या ‘जखमेत वीज माझ्या’ हा कविता संग्रह वाचून झाला. संग्रह हातात पडल्यावर अगदी पहिल्या बैठकीत वाचूनही समाधान मिळालं नाही. पुनः पुन्हा बुकमार्क लावलेले शेर वाचून काढले. या संग्रहाला प्रा. अशोक बागवे यांची प्रस्तावना लाभली आहे. कविवर्य संजय शिंदे यांच्या अष्टगंध प्रकाशनाने ते प्रकाशित केलेले आहे. प्रसिद्धीपासून कोसो दूर राहणारे, शांत स्वभावाचे दिलदार असणाऱया या कवीची लेखनशैली ओघवती आहे हे त्यांच्या कविता वाचल्यानंतर लक्षात येतेच.

चांदण्यातले बोलून सारे झाले आहे

काळोखाशी भांडावेसे वाटत नाही…

दुःख तुझे हे पत्रामधुनी ओघळणारे

खरे सांगतो, वाचावेसे वाटत नाही…

अशीच वेदना आणि सुन्न करणारा अनुभव त्यांच्या पुढच्या कवितेतून आपल्यासमोर येतो.

मी दिलेले मोर जेव्हा सोबती घेऊन गेली

अंगणाचे रंग माझ्या मागणे राहून गेले…

सल व्यक्त करण्यासाठी कविता म्हणजे जिव्हाळय़ाचा कोपरा. त्यांच्या पुढील ओळींतून हा सल किती जिव्हारी असेल याची कल्पनाच आपल्याला येते. आपल्या मनाला समज देणाऱया अशा अनेक वेदना आपण अनुभवू शकतो.

बांधला त्यांनीच होता आसवांचा चौथराही

वेदनेच्या त्या घराला मी कुठे जडलोच नाही…

वास्तव नेमक्या शब्दांत ते टिपतात,

पाठ वाकलेली अन् गुलामी ताठ आहे

दरेक मुजऱयापाठी अशी वतने मिळाली…

मालंडकरांची कल्पनाशक्तीही आपल्याला त्यांचा संग्रह वाचून लक्षात येते,

सोसवे ना सूर्य जेव्हा जाळणारा

घेतले त्याचेच मी मागून डोळे…

या संग्रहात साठ रचना आहेत. अनुक्रमणिका अतिशय कलात्मक. पुनः पुन्हा मी रुजतो आहे, आसवे गळाली,

एकटा आलो इथे मी, माणसे सारी, मोडका संसार आहे, सोसले आतून आहे, शेवटचे गाणे, ऊन थोडे ओसरू दे अशा कितीतरी गजल आपल्याला भावून जातील.

या संग्रहाचे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ आकर्षक आहे. आता पुढच्या पानावर काय, ही उत्सुकता निश्चितच वाढते. पुढच्या संग्रहात निसर्ग आणि सामाजिक विषय आपल्याला नक्कीच वाचायला मिळतील ही आशा आहे.

तुला न घेता आला माझा अखेरचाही निरोप साधा

चुकले माझे काय एवढा सवाल तो आसपास आहे…

का भेट आपुली गे रुसव्यात थांबणारी?

कधीही न भांडण्याचा अपुला ठराव होता…

असे अनेक नाजूक सवाल आपल्याला वाचायचे आहेत. अजित मालंडकर यांचा हा कविता संग्रह जरूर वाचू या.